रेल्वेचा थांबा मिळाल्याने एका बाजूला सुटकेचा नि:श्वास टाकणारे राम मंदिर स्थानक परिसरातील रहिवासी अरुंद रस्ता, अनधिकृत वाहनतळ, अपुरी प्रकाशयोजना आणि स्थानक परिसरातील रिक्षाचालकांच्या लांबच लांब व बेशिस्त रांगा यामुळे मेटाकुटीला आले आहेत. स्थानकामुळे या परिसरात वर्दळ वाढली आहे. परंतु, त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह संबंधित यंत्रणांनीदेखील दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत.

स्थानकाच्या नामकरणावरून ओशिवरा स्थानक चर्चेत आले. मात्र येथील नागरिकांच्या सोयी सुविधांकडे काणाडोळा करण्यात आला आहे. पूर्वी औद्योगिक वसाहत म्हणून या परिसराची ओळख होती. आता या ठिकाणी गेल्या दहा वर्षांत टोलेगंज इमारती उभ्या राहिल्या आहेत. स्थानक परिसराला लागून असलेल्या या वसाहतीतील रहिवाशांना गेल्या वर्षभरापासून वाहतूक कोंडी, अरुंद व नादुरुस्त रस्ते, रस्त्यावरील अपुरा वीजप्रकाश, अनधिकृत वाहनतळ आदी समस्या भेडसावत आहेत.

एस.व्ही. रोड ते स्थानक परिसराला जोडणारा मुख्य रस्ता हा अरुंद असून जागोजागी पेव्हरब्लॉक उखडल्याने खड्डेमय झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत वाहनतळ असल्याने स्थानिकांना रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारावरील झाकणे देखील जागोजागी तुटलेल्या अवस्थेत असून गटारे उघडी पडली आहेत. वर्दळ वाढली परंतु, दिवे कमी असल्याने प्रवाशांची अंधारयात्रा सुरू आहे, असे स्थानिकांनी सांगितले.

मुख्य रस्ता असल्याने सकाळ-संध्याकाळ स्थानकाबाहेर रिक्षाचालकांच्या रांगा असतात. त्यामुळे इमारतीतील मुख्य प्रवेशद्वारातून रहिवाशांना वाहन बाहेर काढणे कठीण होते. त्यामुळे त्यांना शिस्त लागावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक रमेश पटेल यांनी व्यक्त केली. अनेकदा पालिकेत फोन करूनही कारवाई होत नसल्याची खंत स्थानिक नागरिक शैलेजा नाखरे यांनी व्यक्त केली.

रहिवाशांची तक्रार ज्या रस्त्याबाबत आहे, तो एमएमआरडीएच्या अंतर्गत येतो. त्यांना दुरुस्तीबाबत कळविण्यात येईल. तसेच इतर समस्यांचा आढावा घेऊन त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

चंदा राव, सहायक आयुक्त, पी दक्षिण पालिका विभाग