लतादीदींच्या प्रभुकुंजवर कौटुंबिक गप्पांची मैफल

राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी मुंबईत गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत लतादीदींच्या कर्तृत्वाचे गुणगान करतानाच दीदींनी अजरामर केलेले ‘ए मेरे वतन के लोगों’ हे आपले सर्वात आवडते गीत असल्याच्या भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या.

राष्ट्रपती कोविंद यांनी पेडररोडवरील प्रभुकुंज या लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन मंगेशकर कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, मुलगी स्वाती, राज्यपाल सी. विद्यासागर राव, त्यांच्या पत्नी विनोदा, तसेच उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. मंगेशकर कुटुंबीयातील ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि त्यांची नातवंडेही उपस्थित होती.

केवळ देशातीलच नव्हे, तर जगभरातील व्यक्तींनाही तुमचा हेवा वाटतो, अनेकांना तुम्हाला भेटण्याची इच्छा असते. आज आमचीही इच्छा पूर्ण झाली, अशा भावना व्यक्त करीत राष्ट्रपतींनी लता दीदींची विचारपूस केली. ‘ए मेरे वतन के लोगों’ हे आपले सर्वात आवडते गीत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगताच लतादीदींनीही या गाण्यामागील आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, ‘‘हे गाणे गाऊन मी माझ्या रूममध्ये आले असता मेहबूब खान मला शोधत आले. पंडित नेहरू यांनी मला बोलावल्याचा त्यांचा निरोप ऐकून आपले काही चुकले की काय? या विचाराने काळजात धस्स झाले. पण, तुमच्या गाण्याने माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून आल्याचे पंडितजींनी सांगताच मला धन्य वाटले.’’

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळातही एकदा संसदेमध्ये हे गाणे गायले, त्यावेळीही सर्वानी भरभरून दाद दिल्याचे दीदी सांगत असतानाच आपणही त्यावेळी खासदार म्हणून संसदेत होतो, अशी आठवण राष्ट्रपतींनी करून दिली.

सुमारे ४० मिनिटे ही कौटुंबिक भेट आणि गप्पांची मैफल रंगली होती, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. दीदींची संगीत साधना.. आजच्या पिढीला लता मंगेशकर आणि त्यांची संगीत साधना समजावी यासाठी राज्य सरकारने एखादा उपक्रम हाती घ्यावा आपणही त्याला सहकार्य करू, अशी सूचना राष्ट्रपती कोविंद यांनी विनोद तावडे यांना यावेळी केली.