|| निशांत सरवणकर

राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या इतिहासात पावणेदोन कोटींची लाच घेताना पहिल्यांदाच कारवाई झाली असून याबाबत पुण्यातील भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वानखेडे यांना महसूल विभागाने जोरदार विरोध केलेला असतानाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या आग्रहामुळेच त्यांची नियुक्ती झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाने अ‍ॅड. रोहित शेंडे यांना एक कोटी ७० लाखांची लाच घेताना अटक केली आहे. या लाचेच्या रकमेत फक्त पाच लाखांच्या नोटा खऱ्या आहेत. उर्वरित रक्कम कागदाच्या स्वरूपात होती. परंतु शेंडे आणि तक्रारदार यांच्यातील संभाषणात वानखेडे यांचे नाव वारंवार आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. या प्रकरणी अधीक्षक संदीप दिवाण अधिकृतपणे काहीही सांगण्यास तयार नाहीत. परंतु शेंडे यांनी ही लाच उपसंचालक, भूमी अभिलेख यांच्यासाठीच घेतली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

वानखेडे यांची पुणे येथील उपसंचालक, भूमी अभिलेख याच विभागात नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. १८ मे रोजीच्या या पत्राची प्रत ‘लोकसत्ता‘कडे आहे. वानखेडे यांची सेवानिवृत्तीची दोनच वर्षे शिल्लक असल्यामुळे त्यांची तेथे नियुक्ती करावी, असे या पत्रात नमूद आहे. वानखेडे हे ठाणे जिल्हा भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक होते. त्यांची बढती झाल्यानंतर नियमाप्रमाणे त्यांना सुरुवातीला नागपूर आणि नंतर अमरावती या ठिकाणी नियुक्ती दाखविण्यात आली होती. परंतु त्यांची पुणे येथेच नियुक्ती करण्यात यावी, असा आग्रह आठवले यांनी धरला आणि तो मुख्यमंत्री कार्यालयाने मान्य केल्याचे दिसून येत आहे.

वानखेडे यांच्या नियुक्तीला महसूल विभागाने जोरदार आक्षेप घेतला होता, असे उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येते. याबाबत वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘लोकसत्ता’तून बोलतो असे म्हटल्यानंतर भ्रमणध्वनी बंद केला. पुन्हा संपर्क साधला असता भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले.

वानखेडे यांचा गतिमान कारभार!

भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकपदी नियुक्ती झाल्यावर वानखेडे यांनी अल्पावधीतच कमालीची ‘गतिमान’ता दाखविली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनाही यांच्या ‘गतिमान’तेलाही मागे टाकले आहे. दररोज अनेक सुनावण्या हातावेगळ्या करण्याची करामत वानखेडे यांनी केली. त्यांच्या या ‘गतिमान’तेची महसूल विभागात चर्चा आहे.

अनेक जण नियुक्ती, बदलीसाठी येत असताच. काही कार्यकर्तेही विनवणी करीत असतात. अशा वेळी आपण संबंधितांना पत्र देत असतो. याचा अर्थ असा नव्हे की, त्या व्यक्तीला आपण ओळखतो. बाळासाहेब वानखेडे यांच्या नियुक्तीसाठी पत्र दिल्याचे आठवत नाही. वानखेडे यांच्या कृत्याशी आपला काहीही संबंध नाही       – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री