डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’चा ताबा आपल्याकडे राहण्याबाबत मुंबई महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने निर्णय दिला आहे, असा चुकीचा व खोडसाळ प्रचार रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर करीत असल्याचा आरोप रिपाब्लिकन नेते रामदास आठवले यांच्या गटाकडून करण्यात येत आहे. सिद्धार्थ महाविद्यालयात बेकायदा घुसखोरी करणाऱ्या आनंदराज व त्यांच्या साथीदारांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांच्या निषेधार्थ सोमवारी आरपीआयच्या वतीने आझाद मैदानावर निदर्शने करण्यात येणार आहेत.
आनंदराज आंबेडकर यांनी २४ जूनला सिद्धार्थ महाविद्यालयातील पीपल्स सोसायटीचा ताबा घेऊन आपण अध्यक्ष असल्याचे जाहीर केले. त्याला रामदास आठवले यांनी आव्हान दिले आहे.  त्या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनीच आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले व इतर गटांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर शनिवारी सुनावणी झाली. मात्र आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या ताब्यात सोसायटी राहील, असा न्यायालयाने निकाल दिल्याचे सांगितले. त्याला आठवले गटाने आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने तसा कोणताही निर्णय दिला नाही. सर्व गटांच्या वकिलांना आपापली बाजू मांडण्यास सांगण्यात आले. त्यावर १५ जुलैला सुनावणी होणार आहे, परंतु आपल्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला आहे, असा खोडसाळ प्रचार करून आनंदराज आंबेडकर दिशाभूल करीत आहेत, असा आरोप आरपीआयचे सचिव अॅड. दयानंद मोहिते यांनी केला आहे.