केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या कवितांसाठी कायमच चर्चेत असतात. अनेकदा कार्यक्रमांमध्ये भाषणादरम्यान ते ऑन द स्पॉट कविता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकतात. सार्वजनिक कार्यक्रमांबरोबर अनेकदा राज्यसभेमध्येही ते आपल्या कवितांमुळे हास्य कारंजी उडवतात. मात्र सध्या त्यांचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आठवले चक्क करोना विषाणूला भारतामधून परत जाण्यासाठी घोषणाबाजी करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये करोनासंदर्भातील जनजागृतीसाठी काही परदेशी नागरिक बॅनर घेऊन उभे होते. त्यावेळी आठवले यांनी त्यांची भेट घेतली. हे परदेशी नागरिक मूळचे चीनचे असल्याने त्यांनी भारत चीन संबंध या संकटात अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त केला. चीनचे भारतातील काऊन्सील जनरल तांग गुइलाई हेही यावेळेस उपस्थित होते. आठवले आंदोलनाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी भारत चीन संबंध सुदृढ राहोत असं म्हटलं आणि ‘गो करोना… गो… गो करोना… गो’ अशा घोषणा देऊ लागले. आठवले यांना घोषणा देताना बघून उपस्थितांनाही हुरूप आला आणि परदेशी नागरिकांनीही ‘गो करोना’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

मंगळवारी पुण्यामध्ये करोनाचे दोन रूग्ण आढळले असून त्यांच्यावर नायडू रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या ४८ वर पोहचली आहे.