भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रात व राज्यातील मंत्रिमंडळाचा दोनदा विस्तार झाला; परंतु रिपब्लिकन पक्षाला ना केंद्रात, ना राज्यात मंत्रिपद मिळाले. आता तर महायुतीच्या नावाने फक्त भाजप व शिवसेनेचीच समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले संतप्त झाले आहेत.
त्यांनी आता घटक पक्षांची स्वतंत्र समन्वय समिती स्थापन करण्याचा भाजपला इशारा दिला आहे. राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये सध्या अधिकाराच्या वाटपावरून धुसफुस सुरू आहे. वाद विकोपाला जाऊ नये, त्यावर चर्चेतून तोडगा काढावा, यासाठी महायुतीची समन्वय समिती स्थापन करण्याचा भाजपने निर्णय घेतला. त्यानुसार समिती तयार करण्यात आली, परंतु त्यात फक्त भाजप व शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला
आहे. त्यामुळे रामदास आठवले यांनी बुधवारी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलतना तीव्र नाराजी व्यक्त केली.
१९९९ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, जनता दल, भारिप-बहुजन महासंघ, रिपब्लिकन पक्ष (गवई गट) यांचा समावेश होता, तर माकप व भाकपने सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी असलेल्या व बाहेरून समर्थन देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांचा सहभाग असलेली समन्वय समिती स्थापन केली होती.
 भाजपनेही त्याच धर्तीवर समिती स्थापन करावी, अशी रिपाइंची मागणी आहे.