दलित, आदिवासी, भूमिहीन, कष्टकरी यांच्यासाठी लढणाऱ्या रिपब्लिकन पक्षात सिनेकलावंतांचा गोतावळा वाढू लागला आहे. सामान्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणारा पक्ष आता सिने तारे-तारकांच्या प्रश्नांवर आक्रमक झाला आहे. अभिनेत्री डॉली बिंद्राला न्याय मिळवून देण्यासाठी वादग्रस्त राधे मॉंच्या विरोधात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली उद्या शुक्रवारी बोरिवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मूळ भूमिका किंवा अजेंडा सोडून पक्ष भलतीकडेच वाहवत चालल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.
रिपब्लिकन पक्षाला व्यापक स्वरूप देण्यासाठी विविध समाज घटकांतील कार्यकर्त्यांना सोबत घेण्याची नेतृत्वाची भूमिका स्तुत्य असली, तरी सिनेकलावंतांच्या खोगीरभरतीबद्दल कार्यकर्तेच प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत. दिल्लीत ११ ऑगस्टला पक्षाच्या वतीने सामाजिक समता संमेलन घेण्यात आले होते. त्यावेळी निमंत्रण स्वीकारूनही भाजपचे नेते तिकडे फिरकले नाहीत. मात्र सलमा आगा, राखी सावंत, गायक उदित नारायण आदी सिने तारे-तारकांच्या झगमगाटात समता संमेलन पार  पडले.