शिवेसना-भाजपबरोबर युती केल्याच्या बदल्यात काहीही करून राज्यसभेची खासदारकी मिळावी, यासाठी रामदास आठवले यांचे प्रयत्न सुरू आहेत. आरपीआयच्या शिष्टमंडळाने बुधवारी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची भेट घेऊन राज्यसभेची एक जागा व लोकसभेच्या पाच जागा मिळाव्यात अशी मागणी त्यांच्याकडे केली.
मुंबईत बुधवारी आरपीआयचे नेते अर्जुन डांगळे, गौतम सोनावणे, काकासाहेब खंबाळकर व सुरेश बारसिंग यांनी मुंडे यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. त्यावेळी राज्यसभेची एक जागा व लोकसभेच्या पाच जागा मिळाव्यात असा आग्रह धरणारे लेखी पत्र त्यांना देण्यात आले. त्यावर आठवले यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी, यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शविली. अर्थात थोडा शिवसेनेकडेही त्यासाठी पाठपुरावा करा, असा मुंडेंनेही आरपीआयच्या शिष्टमंडळाला सल्ला दिल्याचे सांगण्यात येते.
जागावाटपाची चर्चा लवकर सुरू करावी, अशी मागणी आरपीआयने यापूर्वीच शिवेसनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. सेना नेते लीलाधर डाके, सुभाष देसाई, गजानन कीर्तीकर व मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही तशी मागणी करण्यात आली होती. शिवसेनेने त्यावर ठोस असे काहीही आश्वासन दिले नाही. परंतु राज्यसभेसाठी भाजपकडेही आग्रह धरावा, असा सल्ला सेनानेत्यांनी आरपीआयला दिल्याचे समजते.