भाजप-सेना नेत्यांच्या उपस्थितीत उद्या मेळावा
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुका लढवाव्यात का, याबाबत सकारात्मक विचार केला जात आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
कमळ चिन्ह घेऊन निवडून येणाऱ्या रिपब्लिकन आमदारांचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी, वरळी येथे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, एनएससीआय क्लबच्या सभागृहात रिपब्लिकन पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला दहा जागा मिळाव्यात, अशी मागणी आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. त्याला दोन्ही नेत्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला आहे. भाजप मित्रपक्षांना १८ जागा सोडणार आहे, त्यापैकी दहा जागा रिपाइंला मिळतील, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 3:04 am