महात्मा गांधी यांनी मांडलेल्या विश्वस्त आणि स्वराज्य या कल्पनांचा माझ्यावर मोठा प्रभाव होता. आपल्या जगण्याला महात्मा गांधी यांच्या विचारांचे अधिष्ठान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांनी शुक्रवारी दादर येथे केले.
भटकळ यांनी नुकतीच वयाची ८० वर्षे पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने मुक्तशब्द मासिक आणि प्रकाशन यांच्यातर्फे भटकळ सत्कार आणि कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते भटकळ यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तर ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी भटकळ यांची प्रकट मुलाखत घेतली. डॉ. हरिश्चंद्र थोरात हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
भटकळ पुढे म्हणाले, माझ्यावर ज्यांनी अन्याय केला, त्यांच्यावरही मी प्रेमच केले आणि वि. स. खांडेकर यांच्यासारख्या लोकप्रिय लेखकांची पुस्तके छापणे तसेच उत्तम नसलेल्या पण खपाऊ लेखकांची पुस्तके प्रकाशित करणे हे मोहही मी टाळले. स्पर्धा कधीच मानायची नाही, अशी माझ्या वडिलांची भूमिका होती. त्याच पद्धतीने मीही काम केल्याचे त्यांनी नमूद केले.