मुंबई : राज्य शासनाने तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या निर्णयानुसार, औरंगाबादचे पालकंमत्रीपद रामदास कदम यांच्याकडून काढून घेऊन ते डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. कदमांची ही उचलबांगडी चर्चेचा विषय झाली असून औरंगाबादच्या नामांतरावरून खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर शेरेबाजी केल्यामुळेच हा बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

अनेक वर्षांपासून मागणी होत असताना औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर न होण्यास शिवसेनेचेच मंत्री जबाबदार आहेत, असा आरोप चंद्रकांत खैरेंनी कदम यांच्यावर थेट उल्लेख न निशाणा साधला होता. त्यावर याबाबतचा प्रस्ताव केंद्रात असताना खैरे संसदेत काय करत आहेत, असे प्रत्युत्तर कदमांनी खैरेंना दिले होते. या शेरेबाजीमुळेच रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रामदास कदमांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आले आहे.

खासदार चंद्रकांत खैरेंनी नंदकुमार घोडेले यांना औरंगाबादच्या महापौरपदावर बसवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र, यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांना विश्वासात न घेताच त्यांनी ही भेट घेतल्याचे कदम यांचे म्हणणे आहे. मात्र, यामुळे शिवसेनेतील गटबाजी समोर आली आहे.
दरम्यान, कदम यांना औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरुन हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संमतीनेच घेतल्याचे माध्यमांनी दिलेल्या वृत्तातून कळते.