स्वतःचं अपयश झाकण्यासाठी उगाच चांगल्या कामात खोडा घालू नये अशी टीका पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचं नाव न घेता केली आहे. राज ठाकरेंवर टीका करताना रामदास कदम यांनी काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली? असा खोचक प्रश्नही यावेळी विचारला. आदित्य ठाकरेंनी प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतल्यानेच फक्त मनसेकडून विरोध होतो आहे असंही रामदास कदम यावेळी बोलले आहेत.

‘प्लास्टिकबंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा अचानक घेण्यात आलेला नाही. सहा महिने आधीच या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयानेही तीन महिने वाढवून दिली होते. प्लास्टिकबंदीची ठिकठिकाणी जाहिरातही करण्यात आली होती. त्यामुळे जर एखाद्या पुढाऱ्याला यासंबंधी माहिती नसेल तर ते त्यांचं अपयश आहे. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी उगाच चांगल्या कामात खोडा घालू नये’, असं रामदास कदम बोलले आहेत.

राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीचं उल्लंघन करणाऱ्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. दुसऱ्यांदा उल्लंघने केल्यास १० हजार आणि तिसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्याला २५ हजार रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांची कैद होणार आहे. दरम्यान मनसेने प्लास्टिक बंदीसाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेवरुन टीका केली आहे. सर्वसामान्यांकडून दंड वसूल करण्यात येऊ नये असं मनसेने म्हटलं आहे.