रामदास पाध्ये शब्दभ्रमकार

आमचे एकत्र कुटुंब होते. आम्ही दादरला राहात होतो. आई-वडील, मोठे भाऊ, काका आदी घरातील सर्वाना वाचनाची आवड होती. घरी सर्व वर्तमानपत्रे यायची. सकाळी उठल्यानंतर सर्व जण पेपर वाचत बसलेले मी लहानपणापासून पाहात आलो. मी ही त्यातला एखादा पेपर हातात घ्यायचो आणि त्यातील चित्रे पाहायचो. त्या वेळी मी तीन-चार वर्षांचा असेन. म्हटले तर वाचनाचा संस्कार कळत-नकळत तेव्हापासून झाला. पुढे आई-वडिलांनी वाचनाची गोडी लावली. शालेय वयात असताना आईने मला ‘चांदोबा’ मासिक वाचायला दिले. त्यातील अद्भुत जग मला मजेशीर वाटले. पुढे ‘गोटय़ा’चे वाचन झाले. आमच्या घराखालीच पुस्तकांचे दुकान होते. आई-वडील मला सांगायचे, खाली पुस्तकांच्या दुकानात जाऊन बस आणि तुला पाहिजे ते पुस्तक वाच किंवा आवडले तर घेऊन ये, पैसे आम्ही नंतर देऊ.

अकरावी व बारावी आणि पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना मराठीतील चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल.  देशपांडे आणि अन्य अनेक लेखकांचे विनोदी साहित्य वाचून काढले. मराठीबरोबरच काका हद्रसी, के. पी. सक्सेना, शरद जोशी यांचेही विनोदी साहित्य मोठय़ा प्रमाणात वाचले. सीपी टँक येथे ‘हिंदी ग्रंथ रत्नाकर’ नावाचे पुस्तकांचे दुकान होते. त्या दुकानात जाऊन पुस्तके चाळायचो, वाचायचो. तेव्हा हिंदी व इंग्रजी वाचनही झाले. महाविद्यालयात असताना मी ‘शो’ करत होतो. विनोदी साहित्य वाचनातून ‘विनोदी पंच’ कसे असतात, कसे लिहायचे हे कळत गेले. त्याचा वापर मी माझ्या ‘शो’मध्ये करत असे. मला गूढ कथाही वाचायला आवडतात. त्यामुळे नारायण धारप, जी. ए. कुलकर्णी, रत्नाकर मतकरी यांचीही सर्व पुस्तके वाचून काढली होती. पुढे ‘बोलक्या बाहुल्या’ हे क्षेत्र मी व्यवसाय म्हणून स्वीकारले तेव्हा जाणीवपूर्वक मी वाचनाची दिशा बदलली. ललित साहित्यापेक्षा जगभरातील ‘पपेट्री’ या विषयावरील पुस्तके हळूहळू जास्त प्रमाणात वाचायला लागलो. आपल्या इथे ती पुस्तके मिळाली नाहीत तर मी ती परदेशातूनही टपालाने मागवायचो. आई-वडिलांनी वाचनाची जी काही गोडी लावली, वाचनाचे जे संस्कार केले त्यामुळे पुढे आयुष्यात खूप काही शिकायला मिळाले. पुस्तके आणि वाचनाने माझे आयुष्य घडविले.

पूर्वी आणि आजही माझी एक सवय आहे. पुस्तक किंवा वृत्तपत्रातील मला आवडलेले एखादे चांगले वाक्य, लेख, छायाचित्र मी आजही कापून एका धारिकेत लावून ठेवतो. पाहिजे  तेव्हा ते वाचता येते. वाचनातून आपले विचार घडतात. जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन मिळतो. कोणत्याही कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच वाचन करणे आवश्यक आहे. त्यातून नवे विचार, कल्पना सुचतात. कलाकारासाठी विचार थांबणे हे घातक आहे असे वाटते. जीवनात कधी कठीण प्रसंग येतो, मन:स्थिती ठीक नसते तेव्हा मी चिं. वि. जोशी, पु. ल. अत्रे, दत्तू बांदेकर, काका हत्रसी यांची पुस्तके वाचतो. ते वाचून मनावरची मरगळ, अस्वस्थता दूर होते. मी पुन्हा ताजातवाना आणि आनंदी होतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास कोणत्याही विषयावरील एखादे तरी पुस्तक वाचतोच. आज स्मार्ट भ्रमणध्वनी किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू वाचनासाठी उपलब्ध असल्या तरीही पुस्तके किंवा वृत्तपत्रे हातात घेऊन किंवा पाने उलटून वाचण्यातली जी मजा आणि आनंद आहे तो त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये नाही.

आजच्या पिढीत वाचनाची आवड हळूहळू कमी होत चालली आहे ते खरे आहे. पण आई-वडिलांनी आपल्या मुलांमध्ये ती जाणीवपूर्वक निर्माण केली पाहिजे. मुलांना वाचनाची गोडी कशी लागेल, त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांना ती पुस्तके आणून दिली पाहिजेत. अर्थात बदलती जीवनशैली, नोकरीसाठी घराबाहेर असणारे आई-वडील किंवा त्या दोघांनाच वाचनाची आवड नसणे या गोष्टीही आहेत. मात्र असे असले तरी यात सुधारणा झाली पाहिजे. आमच्या दोन्ही मुलांना मी आणि अपर्णाने वाचनाची गोडी लावली आणि आमच्या मुलांनीही वाचनाची आवड जाणीवपूर्वक जोपासली आहे.

चार्ली चॅप्लीन आणि मार्सेस मार्सो यांची आत्मचरित्रे वाचून मी खूप प्रभावित झालो. कलाकारांची आत्मचरित्रे मला नेहमीच भावतात आणि आवडतात. मी नऊ वर्षांचा असताना माझ्या वडिलांनी मला ‘बिर्ला मातोश्री’मध्ये मार्सोच्या कार्यक्रमाला नेले होते. पुढे वयाच्या ७५व्या वर्षांत असताना मार्सो पुन्हा भारतात आले होते. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मी त्याच्या आत्मचरित्रावर त्यांची स्वाक्षरी घेतली होती. त्या वेळी माझ्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर हे होते. चार्ली आणि मार्सो यांनी भाषेपलीकडे जाऊन आणि एक शब्दही न बोलता जे करून दाखविले ते अचाट आहे.आजही देशात किंवा परदेशात कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणे झाले की आवर्जून चांगली पुस्तके विकत घेतो. कपडे आणि अन्य सामानाबरोबर पुस्तकांचीही माझी एक वेगळी बॅग असते. विविध विषयांवरील मराठी, इंग्रजी व हिंदी आणि केवळ ‘पपेट्री’ या विषयावरील अनेक पुस्तके माझ्या स्वत:च्या संग्रहात आहेत. वाचनाने मला खूप समृद्ध केले.