२६/११ हल्ल्यानंतर केवळ पाहणी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत हॉटेल ताजला भेट देणाऱ्या आणि त्यानंतर आपल्या कृत्याबद्दल माफीचा चकार शब्दही न काढणाऱ्या रामगोपाल वर्मा यांनी डॉ. गिरीश ओक यांची एका प्रकरणात सपशेल माफी मागितली आहे.
डॉ. ओक यांच्या परवानगीशिवाय त्यांचा आवाज आपल्या आगामी ‘सत्या २’ या चित्रपटासाठी वापरणाऱ्या वर्मा यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप डॉ. ओक यांनी केला होता. याबाबत डॉ. ओक यांनी भारतीय चित्रपट सेनेकडे धावही घेतली होती. अखेर शनिवारी  वर्मा यांनी आपला लेखी माफीनामा रविवारी डॉ. ओक यांच्याकडे पाठवून दिला. तसेच यापुढे कोणत्याही कलाकाराच्या बाबतीत असे करणार नाही, अशी ग्वाहीदेखील दिली आहे.
‘सत्या २’ या चित्रपटासाठी ‘ऑडिशन’ देण्यास डॉ. गिरीश ओक यांना रामगोपाल वर्मांच्या कार्यालयातून बोलावणे आले होते. डॉ. ओक यांनी रितसर चाचणी दिल्यानंतर त्यांना काहीच कळवण्यात आले नाही. मात्र ‘सत्या २’च्या ‘ट्रेलर’मध्ये डॉ. ओक यांचा आवाज वापरण्यात आल्यानंतर डॉ. ओक यांनी आपली नाराजी कळवत माफीनामा सादर करण्यास सांगितले होते. मात्र वर्मा यांनी माफी मागण्यास नकार दिला होता.  याप्रकरणी भाचिसेने सात दिवसांची मुदत देऊन चित्रीकरण बंद पाडण्याचा इशारा दिल्यानंतर वर्मा यांनी रविवारी  माफी मागितली.