शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्याने सभापतीपद आता राष्ट्रवादीला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव निश्चित झाले आहे. १६ वर्षे उपसभापतीपद भूषविलेल्या वसंत डावखरे यांना बढती मिळेल, अशी अपेक्षा होती. पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय रामराजे नाईक-निंबाळकर यांना संधी दिली जाणार आहे. उपसभापतीपद भाजपला दिले जाण्याची चर्चा असल्याने डावखरे यांच्या भवितव्याबद्दल टांगती तलवार आहे. फलटण मतदारसंघ राखीव झाल्याने २०१० मध्ये निंबाळकर यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.
दुसरा अविश्वास ठराव मंजूर
पीठासीन अधिकाऱ्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर होण्याची राज्याच्या इतिहासातील दुसरी घटना आहे. ५ एप्रिल १९७९ रोजी विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष गजाननराव गरुड यांच्या विरोधातील अविश्वास ठराव १८३ विरुद्ध ० मतांनी मंजूर झाला होता.
त्यानंतर विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वास सोमवारी मंजूर झाला.
राष्ट्रवादीचा डोळा आता विरोधी पक्षनेतेपदावर
काँग्रेसकडून विधान परिषदेचे सभापतीपद काढून घेण्यात आल्यावर राष्ट्रवादीचे पुढचे उद्दिष्ट विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडून काढून घेणे हे आहे. काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले. आर. आर. पाटील यांच्या निधनाने राष्ट्रवादीची एक जागा कमी झाली असली तरी पोटनिवडणुकीत ती पुन्हा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली आहे. राष्ट्रवादीने या पदावर आधीच दावा केला असून, राष्ट्रवादी आणि भाजपमधील जवळीक लक्षात घेता राष्ट्रवादीची खेळी यशस्वी होऊ शकते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2015 1:44 am