विधान परिषदेच्या सभापतीपदी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रामराजे निंबाळकर यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मांडला आणि पक्षाचे नेते जयदेव गायकवाड यांनी त्याला अनुमोदन दिले. या प्रस्तावाला कोणीही विरोध न केल्यामुळे त्यांची एकमताने निवड करण्यात आली. सभापतीपदी निवड झाल्यानंतर सभागृह नेते एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी रामराजे निंबाळकर यांना त्यांच्या आसनापर्यंत नेले.
सभापतीपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता होती. या पदासाठी कॉंग्रेसने शरद रणपिसे यांना, शिवसेनेने नीलम गोऱहे यांना उमेदवारी दिली होती. अपक्ष सदस्य श्रीकांत देशपांडे यांनीसुद्धा सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या सर्व सदस्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. कॉंग्रेसचे रुपनवार यांनी शरद रणपिसे यांच्या निवडीसंदर्भात दिलेला प्रस्ताव मागे घेतला. त्यानंतर शिवसेनेच्या अनिल परब यांनी नीलम गोऱहे यांच्यासंबंधीचा प्रस्ताव मागे घेतला. त्यामुळे रामराजे निंबाळकर यांची एकमताने निवड झाली. त्यांच्या निवडीचा प्रस्ताव सुनील तटकरे यांनी मांडल्यानंतर त्याला कोणीच विरोध न केल्यामुळे त्यांची निवड झाल्याचे उपसभापती वसंत डावखरे यांनी जाहीर केले.
विधान परिषदेचा सभापती बिनविरोध निवड होण्याची परंपरा आहे. रामराजे निंबाळकर यांचीही बिनविरोध निवड झाल्यामुळे ही परंपरा कायम राहिली आहे. निवडीनंतर वसंत डावखरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, धनंजय मुंडे, माणिकराव ठाकरे यांनी रामराजे निंबाळकर यांचे अभिनंदन केले.