बॉलिवूडमधील कलाकार अजूनही जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकत नाहीत, असे सांगत दिग्दर्शिका मीरा नायर यांनी आपल्या ‘रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’ या चित्रपटासाठी पाकिस्तानी अभिनेता रिझ अहमदची निवड केली आहे. या चित्रपटासाठी पहिल्यांदा इम्रान खान आणि रणबीर कपूर या दोघांच्याही ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. मात्र, बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या रणबीरचा चेहराही जागतिक स्तरावर सर्वमान्य होईल, असा नसल्याचे मत मीरा नायर यांनी व्यक्त के ले.
‘फिक्की फ्रेम्स’साठी भारतात उपस्थित असलेल्या मीरा नायर यांनी ‘रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’ चित्रपटाविषयी माहिती दिली. हा चित्रपट मोहसिन हमीद यांच्या कादंबरीवर बेतलेला असून प्रेमभंगामुळे खचलेल्या पाकिस्तानी युवकाची कथा यात आहे. ‘या व्यक्तिरेखेसाठी जागतिक स्तरावर सर्वमान्य होईल असा चेहरा मी शोधत होते. त्यासाठीच मी रणबीरची ऑडिशनही घेतली. तो खूप चांगला अभिनेता आहे पण, दुर्दैवाने त्याच्यात मला माझ्या चित्रपटाची व्यक्तिरेखा सापडू शकली नाही’, असे मीरा नायर यांनी म्हटले आहे.