शरद पवार आणि नितीन गडकरी यांचे खडे बोल

मुंबई : नारायण राणे यांनी मुळात शिवसेना सोडायलाच नको होती, पण त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची मोठी चूक केली, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राणे यांना शुक्रवारी खडे बोल सुनावले. ‘दिल्लीत गेलो तरी मनाने महाराष्ट्रातच आहे आणि अजूनही राज्यात भरपूर काम करायचे आहे, असे सांगत राणे यांनी दिल्लीत खूश नसल्याची कबुली दिली.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मराठी आणि इंग्रजी भाषांमधील आत्मकथन पुस्तकांचे प्रकाशन पवार आणि गडकरी यांच्या हस्ते पार पडले. तेव्हा राणे यांच्या पक्षांतरांवरून पवार आणि गडकरी यांनी राणे यांना टोले लगावले. कोकणातील छोटय़ा गावात जन्मलेला आणि चेंबूरमधील गिरणी कामगाराचा मुलगा, घराण्याची कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना राज्याचा मुख्यमंत्री होतो ही उल्लेखनीय बाब असल्याचे सांगत पवार यांनी राणे यांचा गौरव केला.  शिवसेनेने त्यांना मुख्यमंत्री केले;  पण शिवसेना सोडण्याचा निर्णय चुकीचाच होता. यानंतर काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हा राणे यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता. त्यावर राणे यांनी दोन चिठ्ठय़ा टाकल्या. काँग्रेसची चिठ्ठी आल्याने त्यांनी काँग्रेसप्रवेशाचा निर्णय घेतला होता. आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला ही चूक की घोडचूक होती हे राणे यांनीच ठरवावे, असे पवार म्हणाले.

काँग्रेसमध्ये प्रवेश करताना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते, पण हे आश्वासन पाळण्यात आले नाही, अशी राणे यांची तक्रार आहे. काँग्रेसमध्ये आश्वासनाची लगेचच कधीच पूर्तता केली जात नाही. ताटकळत ठेवले जाते. यातून पुढे जायचे असते. उभे आयुष्य काँग्रेसमध्ये घालविल्याने आम्ही हे शिकलो. राणे यांना बहुतेक काँग्रेसच्या राजकारणाचा अनुभव आला नसावा, अशी टिप्पणीही पवार यांनी केली.

शिवसेना सोडण्याचा राणे यांचा निर्णय चुकीचाच होता. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करू नये म्हणून त्या काळात त्यांनी मनधरणी करण्याकरिता आठवडाभर दररोज त्यांच्या निवासस्थानी जात असे; पण राणे यांनी निर्णय घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात त्यांनी चूकच केली होती, असे मत  गडकरी यांनी व्यक्त केले.

आज जो काही आहे त्याचे सारे श्रेय शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांना असल्याची कृतज्ञता नारायण राणे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र, गडकरी आणि पवार

‘देशात जे नाही ते महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात जे आहे ते कुठेच नाही’ अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली. दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे महत्त्व कळले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. गडकरी यांच्या महाराष्ट्रप्रेमाचा धागा पकडत पवार यांनी, गडकरी यांनी महाराष्ट्राचे तोंडभरून कौतुक केल्याने भाजपकडून वेगळ्या राज्याची मागणी होणार नाही, असा टोला हाणला.