नीलेश अडसूळ, मुंबई

राज्यातील महाविद्यालयीन तरुणांमधील सांस्कृतिक व साहित्यविषयक जाणिवा वृद्धिंगत करण्याकरिता ‘राज्य मराठी विकास संस्थे’तर्फे आयोजिण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा आणि उपक्रमांना सत्तापालटानंतर घरघर लागण्याची शक्यता आहे. याचा पहिला फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘रंगवैखरी’ या राज्यस्तरीय कलाविष्कार स्पर्धेला बसला आहे. स्पर्धेची प्राथमिक फे री दोन दिवसांवर आलेली असताना केवळ तांत्रिक कारणे देत शुक्रवारी अनिश्चित काळासाठी ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. संस्थेतील अनागोंदी कारभाराचा फटका लोकसाहित्य सादरीकरण स्पर्धेसह अन्य उपक्रमांना बसण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासन संचालित राज्य मराठी विकास संस्थेतर्फे  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकांकिका स्वरूपातील संगीत, गायन, नृत्य, नाटय़, शिल्प आणि चित्र अशा विविध कलांचा संगम साधणारी राज्यस्तरीय कलाविष्कार स्पर्धा गेली दोन वर्षे सातत्याने घेण्यात येत आहे.

यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून २२ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धेची प्राथमिक फे री रंगणार होती. परंतु अचानक संस्थेने रंगवैखरी स्पर्धेच्या अधिकृत ‘फेसबुक पेज’वर स्पर्धा स्थगित केल्याचे जाहीर केले. दोन दिवसांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी आल्याने सर्वच महाविद्यालये सादरीकरणासाठी सज्ज झाली होती. परंतु या निर्णयानंतर राज्यभरातील सर्वच सहभागी महाविद्यालयांना मोठा धक्का बसला. मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, अमरावती, जळगाव, बेळगाव, कोल्हापूर, गोवा अशा दहा केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना भरघोस पारितोषिके मिळवून देणाऱ्या या स्पर्धेसाठी यंदा ‘कथारंग’ ही संकल्पना देण्यात आली होती.

नाटय़ाविष्काराच्या माध्यमातून मराठी साहित्य तरुणांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा सुरू करण्यात आली. दोन वर्षे राज्यभरातून या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरीही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय संस्थेने का घेतला, याबाबत संभ्रम आहे.

या स्पर्धेपाठोपाठ जानेवारीत होऊ घातलेली लोकसाहित्य सादरीकरण स्पर्धाही स्थगित होण्याच्या मार्गावर आहे. इतकेच नव्हे तर भविष्यात या स्पर्धा कायमच्याच बंद करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजले.  याविषयी संस्थेच्या प्रभारी संचालिका मीनाक्षी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, काही प्रक्रिया पूर्ण झाल्या नसल्याने काही काळासाठी स्पर्धा स्थगित के ल्याचे जुजबी उत्तर दिले. स्पर्धा भविष्यात होणार का याचेही उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.

महाविद्यालयांचे आर्थिक नुकसान

महाराष्ट्रातून अनेक महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी होतात. अनेक महाविद्यालयांनी तर तालमीही सुरू केल्या होत्या. ‘स्पर्धा काही दिवसांवर आल्याने आमच्या अखेरच्या तालमी सुरू आहेत. नेपथ्य, कपडे आणि इतर काही तांत्रिक गोष्टींवर लाखभर रुपये खर्च झाले आहेत. उद्या स्पर्धा रद्द झाली तर आमचा हा खर्च पाण्यात जाणार आहे. शिवाय मुलांची मेहनतही वाया जाणार,’ अशी प्रतिक्रिया एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी व्यक्त केली.