News Flash

भायखळा उद्यानाच्या शुल्कवाढीविरोधात ऑनलाइन याचिका

सुमारे दीडशे वर्षांपूर्वी भायखळ्यातील संबंधित जागा वनस्पती उद्यान म्हणून वसवण्यात आली.

 

भायखळा येथील उद्यानाचे प्रवेश शुल्क ५ वरून १०० रुपये करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला सेव्ह राणी बाग फाउंडेशनने ऑनलाइन याचिकेच्या माध्यमातून विरोध सुरू ठेवला आहे. प्रवेश शुल्क वाढवल्यामुळे शहरातील या दीडशे वर्षे जुन्या वनस्पती उद्यानाची दारे सर्वसामान्यांना बंद होणार असल्याचा आक्षेप संस्थेने घेतला आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन पक्ष्यांचे दर्शन खुले झाल्यानंतर महानगरपालिकेने या उद्यानाचे शुल्क प्रौढांसाठी पाचवरून १०० रुपये व १२ वर्षांखालील मुलांसाठी दोन रुपयांवरून २५ रुपये करण्याचा निर्णय घेतला. उद्यानाचा विकास तसेच पेंग्विनच्या देखभालीचा खर्च प्रवेश शुल्कामधून थोडाफार भरून काढण्याचा पालिकेचा मानस आहे. मात्र या शुल्कवाढीला सेव्ह राणी बाग संस्थेने विरोध दर्शवला. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तसेच आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आता संस्थेकडून ऑनलाइन याचिका अपलोड करण्यात आली आहे.  http://www.saveranibagh.org/petitionN.php  या संकेतस्थळावर ही याचिका उपलब्ध असून त्यावर सही करण्याचे आवाहन संस्थेने नागरिकांना केले आहे. सही करणाऱ्याचा इमेल आयडी गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही संस्थेकडून सांगण्यात आले.

सुमारे दीडशे वर्षांपूर्वी भायखळ्यातील संबंधित जागा वनस्पती उद्यान म्हणून वसवण्यात आली. अत्यंत दुर्मीळ असलेले वृक्ष येथे लावण्यात आले. त्यानंतर काही वर्षांनी येथे प्राणिसंग्रहालय सुरू करण्यात आले. आजही या उद्यानातील ६३ टक्के जागा झाडे व बगिचांनी व्यापली असून केवळ १८ टक्के जागेवर प्राण्यांचे पिंजरे आहेत. प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचा खर्च वसूल करण्यासाठी सरसकट प्रवेश शुल्कात वीस पटींनी वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचा या झाडांशी संपर्कच उरणार नाही, असे सेव्ह राणी बाग फाउंडेशनच्या सदस्य शुभदा निखार्गे यांनी सांगितले. आलिशान आराखडे, स्थानिक पातळीवरील पर्याय उपलब्ध असूनही आयात केलेले सामान, त्याच्या देखरेखीसाठी लागणारे प्रचंड शुल्क आणि सल्लागाराला मोजलेले मोठे शुल्क या निकषांवर शुल्कवाढ करून या वनस्पती उद्यानात येण्यापासून सर्वसामान्यांना रोखणे योग्य नाही, असेही शुभदा निखार्गे म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती श्रीकृष्ण, राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुखटणकर आणि व्ही. रंगनाथन आदींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शुल्कवाढ न करण्याची मागणी केली.

त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त शरद काळे तसेच द. म. सुखटणकर यांनीही पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन शुल्कवाढ न करण्यास सुचवले. भायखळा उद्यानातील झाडे तोडून होऊ घातलेल्या नूतनीकरणाला विरोध करण्याच्या उद्देशाने सेव्ह राणी बाग समिती दहा वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. या समितीच्या प्रयत्नांमुळे या उद्यानातील सर्व झाडे ठेवून नवीन आराखडा तयार करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 4:11 am

Web Title: rani baug entry fees charges increase
Next Stories
1 ‘वैद्यकीय’च्या ८५ टक्के जागा राज्यासाठी राखीव
2 ११ हजार गावे दुष्काळमुक्त : राज्यपाल
3 सेना-भाजप यांच्यात ‘सामना’ टळला, वाद कायम
Just Now!
X