24 November 2017

News Flash

आमदार नितेश राणेंविरोधात खंडणीचा गुन्हा

नितेश सातत्याने धमकावत होते

खास प्रतिनिधी, मुंबई | Updated: May 20, 2017 2:00 AM

नितेश राणे ( संग्रहित छायाचित्र )

पक्षांतराच्या तयारीत असलेल्या नारायण राणेंची पत्र नितेश यांच्यामुळे कोंडी होण्याची शक्यता आहे. जुहू तारा रोड येथील हॉटेलमालकाला धमकावून ५० टक्के भागीदारी मिळवणे, हॉटेल सुरू ठेवण्यासाठी पाच महिन्यांत ५० लाखांहून अधिक खंडणी उकळणे आणि हॉटेलमालकाने जून महिन्यापासून खंडणी देण्यास असमर्थता दर्शवल्याने शिवीगाळ करून हॉटेलची तोडफोड करणे, हॉटेल बंद पाडणे या आरोपांन्वये आमदार नितेश यांच्यावर सांताक्रूझ पोलिसांनी शुक्रवारी पहाटे गुन्हा नोंदवला. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून नितेश यांनाही या प्रकरणी लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून नितेश सातत्याने धमकावत होते, असा दावा हॉटेलमालक हितेश जगदीश केसवानी यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. केसवानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार मे २०१६ मध्ये भागीदार निखिल मिराणी यांच्यासोबत जुहू तारा रोडवरील निचाणी कुटीर इमारतीत तळमजल्यावरील जागा भाडय़ाने हॉटेलसाठी घेतली. हॉटेल सुरू करण्यासाठी दोघांनी सुमारे ६ कोटींची गुंतवणूक केली. ऑक्टोबर २०१६ मध्ये नितेश यांनी भेटण्यासाठी बोलावले. पहिल्याच भेटीत त्यांनी मला विचारल्याशिवाय माझ्या शेजारील इमारतीत तुम्ही जागा कशी घेतली? माझ्या सहभागाशिवाय इथे हॉटेल किंवा अन्य व्यवसाय सुरू होऊ शकत नाही, अशी धमकी दिली. या भेटीनंतर जागेचे मूळ मालक किशोर निचाणी यांना विचारणा केली असता त्यांनी ही जागा मिळवण्यासाठी नितेश यांनी  दबाव आणला होता, असे सांगितले.

त्यानंतर काही दिवसांनी नितेश यांनी पुन्हा दूरध्वनी करून भेटण्यासाठी बोलावून घेतले व हॉटेलमध्ये भागीदारी देण्याबाबत काय विचार केला, असा प्रश्न केला. तेव्हा फुकट भागीदारी देण्यास नकार दिला. त्यानंतर नितेश यांनी शहरातल्या विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये, कार्यालयांमध्ये चार ते पाच भेटी घेतल्या व भागीदारीबाबत चर्चा केली. प्रत्येक वेळी त्यांना नकार दिला.

पोलिसांनी नितेश राणे, मोईन शेख आणि महोम्मद अल्ताफ अन्सारी या तिघांविरोधात खंडणीसाठी धमक्या, सामाईक इराद्याने घुसखोरी अशा स्वरूपाचा गुन्हा नोंदविला.

या प्रकरणी पोलिसांनी शेख व अन्सारी यांना अटक केली आहे.  या प्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस प्रवक्त्या डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली. या प्रकरणी प्रतिक्रियेसाठी नितेश यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

First Published on May 20, 2017 2:00 am

Web Title: ransom crime on nitesh narayan rane