रसिका मुळ्ये

बारावीची परीक्षा तोंडावर आली तरीही महाविद्यालयाच्या मान्यतेच्या तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्यामुळे ठाण्यातील राव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बारावीचे अर्ज अद्यापही भरण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे याबाबत तक्रार केली आहे.

बारावीची परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू होत आहे. परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी राज्यमंडळाने मुदत वाढवून दिली. त्यानुसार नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदतही सोमवारी (२५ नोव्हेंबर) संपत आहे. मुदत संपण्यासाठी अवघा एक दिवस राहिला तरीही अद्याप ठाण्यातील राव कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज अद्यापही भरण्यात आलेले नाहीत. विद्यार्थ्यांकडून हजार रुपयांचे परीक्षा शुल्कही महाविद्यालयाने घेतले आहे. मात्र, महाविद्यालयाला अद्याप राज्यमंडळाकडून इंडेक्स क्रमांक मिळालेला नाही. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची पूर्तता महाविद्यालयाने केलेली नाही. शिकवणी आणि महाविद्यालय अशी एकत्रित संस्था (इंटिग्रेटेड) आहे. महाविद्यालयाकडे आवश्यक पायाभूत सुविधा, नियमित शिक्षक नसल्यामुळे परवानगी मिळणार का याबाबतही शंका असल्याचे पालकांनी सांगितले.

परीक्षा तोंडावर आलेली असताना महाविद्यालयाने अर्जच भरले नसल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थी आणि पालक हतबल झाले आहेत. पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार केली आहे. वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. ठाण्यासह मुंबईतील इतर शाखांनाही अनुक्रमांक मिळाला नसल्याचे कळते आहे. त्याचा साधारण पाचशे विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

संगणक विषयाची वर्षभराची प्रात्यक्षिके महाविद्यालयाने महाविद्यालयाने गेल्या महिन्यात ही प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर घेतली. बारावीचा अभ्यासक्रमही शिकवून पूर्ण झालेला नाही. व्यवस्थापनाबरोबर बैठक घेण्याची मागणी पालक करत आहेत. मात्र व्यवस्थापनाकडून त्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी दोन महिन्यांनी बदलले जातात, अशा तक्रारही पालकांनी केल्या आहेत. ‘महाविद्यालयाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात इंडेक्स क्रमांक मिळेल आणि परीक्षा अर्ज भरता येतील असे सांगितले होते. मात्र अजूनही विद्यार्थ्यांचे अर्ज भरलेले नाहीत. वेळेवर अर्ज भरले नाहीत तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ  शकते,’ असे एका पालकांनी सांगितले. याबाबत महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातील चिराग राव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.