News Flash

मध्यावधी निवडणूक अशक्य!

तर भाजपला फटका -विखे यांचा अंदाज

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

रावसाहेब दानवे यांनी शक्यता फेटाळली; तर भाजपला फटका -विखे यांचा अंदाज

भाजप मध्यावधी निवडणुकीला तयार असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘कथित’ वक्तव्यावरून शिवसेनेत पडसाद उमटले आणि भाजपकडे निवडणुकीसाठी पैसे असल्यास ते शेतकऱ्यांना द्यावेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारता मात्र मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही, मात्र काही परिस्थितीमुळे लादल्या गेल्यास त्यासाठी भाजप तयार असल्याचे स्पष्ट केले.

भाजप मध्यावधी निवडणुकीला तयार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधीही केले आहे. पण अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानिमित्ताने ते केले गेल्याच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढविला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दय़ावरूनही त्यांनी भाजपला लक्ष्य केले.  शहा हे मुंबई भेटीत ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनिमित्ताने ही भेट होणार आहे. मात्र शिवसेना-भाजपमधील संबंध तणावाचे झाल्याच्या पाश्र्वभूमीवर हा मुद्दाही शिवसेनेकडून मांडला जाण्याबाबत विचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा शिवसेनेवर राग असून अनेकदा मुंबईत येऊनही शहा ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले नव्हते. पण राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या मतांची गरज असल्याने शहा हे ठाकरे यांना भेटणार आहेत. रालोआचा उमेदवार निश्चित करताना शिवसेनेचे मत विचारात घ्यावे अन्यथा उमेदवार पाहून निर्णय घेतला घ्यायचा, असे शिवसेनेने ठरविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

..तर काँग्रेसही तयार

नगर: कर्जमाफीच्या मूळ विषयाला बगल देण्यसाठीच मुख्यमंत्र्यांनी मध्यावधी निवडणुकांचा विषय उपस्थित केला आहे. मध्यावधी निवडणुकांसाठी काँग्रेसचीही तयारी आहे. मध्यावधी निवडणुकीचा विषय उपस्थित केल्याने मुख्यमंत्र्यांचा आतामविश्वास कमी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच शिवसेना सरकारमध्ये रोज करत असलेल्या ताणाताणीतूनच मुख्यमंत्र्यांनी मध्यावधीचे संकेत दिले आहेत, परंतु त्यांनाच त्याचा फटका बसेल, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 2:23 am

Web Title: raosaheb danve on midterm elections in maharashtra
Next Stories
1 आधी अभ्यास करा, मग याचिका..
2 शेतकरी कर्जमाफीसाठी उत्पन्न वाढीवर सरकारचे लक्ष !
3 राज्यमंत्री वायकर यांच्या संस्थेची व्यायामशाळा सरकारकडे जमा
Just Now!
X