मुंबईतून युपी-बिहारसाठी आणखी दोन स्पेशल ट्रेन सुरू करण्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे. भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी या संदर्भात रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. मुंबई महानगर प्रदेशात पश्चिम भागात उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे स्पेशल ट्रेन सुरु करण्याची मागणी संजय पाण्डेय यांनी केली होती.

संजय पाण्डेय म्हणाले, “रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि MMR क्षेत्राच्या पश्चिम भागात राहणाऱ्या उत्तर भारतीयांची मोठी संख्या लक्षात घेऊन, वांद्रे टर्मिनस मुंबई ते वाराणसी/प्रयागराज आणि मुजफ्फरपूर/दरभंगा मार्गे वसई जंक्शन मार्गे २ नवीन ट्रेन सुरु करण्याबाबत प्रस्ताव मांडला. ज्यामुळे पश्चिम भागात राहणाऱ्या उत्तर भारतीयांना बिहार आणि उत्तर प्रदेशात येणे सोयीचे होईल आणि ट्रॅफिकचे देखील विकेंद्रीकरण होईल. वसई विरार येथे असलेल्या प्रवाशांना अनावश्यक वेळ आणि पैसा खर्च करून कुर्ला किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जावे लागणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल.”

दरम्यान, हा विषय पूर्णपणे ऐकल्यानंतर प्रवासादरम्यान उत्तर भारतीयांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेतल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी लवकरच या २ नवीन विशेष गाड्या सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे संजय पाण्डेय म्हणाले.

रावसाहेब दानवेंचं मुंबई लोकलसंबंधी मोठं विधान

ठाकरे सरकारने करोना रुग्णसंख्या कमी झालेल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी करत जनतेला दिलासा दिला आहे. मात्र अद्यापही मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. लोकल सेवा अद्यापही सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने एकीकडे लोक नाराजी व्यक्त करत असताना दुसरीकडे विरोधकही टीका करत आहेत. दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई लोकलसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे.

“राज्य सरकारने आता राज्यातील निर्बंध शिथिल केल्याचा आधार घेत केंद्र सरकारला रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली तर आम्हाला काही अडचण नाही. राज्य आपली भूमिका जाहीर करत नाही तोवर केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. कारण शेवटी राज्य करोना स्थिती हाताळत आहे,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. राज्य सरकारने करोना स्थिती आटोक्यात आली आहे सांगत रेल्वे वाहतूक सुरु करण्याची विनंती केल्यास आम्ही परवानगी देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.