रावसाहेब दानवे यांची गुगली; भाजप प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड
आगामी मुंबई महापालिका निवडणूक युती म्हणून लढणार की नाही हे गुलदस्त्यात ठेवत मुंबई महापालिकेवर झेंडा भाजपचाच फडकेल, असे रोखठोक वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी केले. सेनेकडून होणाऱ्या टीकेविषयी बोलताना अशा टीकेविषयी आता सेनेलाही काही वाटत नाही आणि आम्हालाही काही वाटत नाही, असे सांगून आगामी काळात भाजपची वाटचाल कशी असेल ते अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची सोमवारी तीन वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक पुरुषोत्तम रुपाला, सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसचे जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत दानवे यांची एकमताने निवड करण्यात आली. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे दानवे यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आज तीन वर्षांसाठी त्यांची निवड करण्यात आली. दानवे यांच्या वर्षभराच्या काळात पक्षाला ग्रामपंचायत ते महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तर सरकार व पक्ष यामध्ये समन्वय साधून शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याला आपले प्राधान्य राहील, असे दानवे यांनी सांगितले.
उद्धव यांच्याशी सौहार्दाचे संबंध
प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना-भाजप समन्वय समितीच्या बैठका नियमितपणे होत असून शिवसेना नेते उद्धव यांच्याशीही आमचे संबंध चांगले असल्याचे ते म्हणाले. कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणी आम्ही वेगळे लढून चांगल्या जागा मिळविल्या. आज राज्यातील २१०० ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला असून गेल्या वर्षभरात ग्रामपंचायत, नगरपालिका तसेच महापालिकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याला काही कारणे आहेत, परंतु तो लवकरच होईल तसेच महामंडळांच्या नियुक्त्याही केल्या जातील असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रदेश कार्यकारिणीही लवकरच जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळ हा भाजपसाठी मोठा विषय असून त्यासाठी आमदार व पदाधिकाऱ्यांची पथके तयार करून जिल्हानिहाय शासनाची मदत योग्य पद्धतीने पोहोचते आहे अथवा नाही याचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा राजकीय विषय होऊ नये. सर्व पक्षांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे केला पाहिजे, असेही दानवे यांनी सांगितले.

अनेक ठिकाणी निवडणुकीनंतर सेना-भाजप एकत्र आहेत. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडकेल.
– रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप