शेजारी राहणाऱ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मागच्या दोन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या विकास माळी या आरोपीची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. बलात्कार पीडितेच्यापोटी जन्मलेल्या बाळाबरोबर विकासचा डीएनए मॅच झाला नाही. दोघांचे डीएनए वेगळे असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायाधीश रेवती डेरे यांनी विकासची १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

विकास माळीला पोलिसांनी बलात्काराच्या कलम ३७६ आणि पॉस्को कायद्याखाली अटक केली होती. जर तो दोषी ठरला तर सात वर्ष तुरुंगवास किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. सप्टेंबर २०१७ मध्ये न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल मिळाला त्यामध्ये विकास बलात्कार पीडितेच्यापोटी जन्मलेल्या बाळाचा जीवशास्त्रीय पिता नसल्याचे स्पष्ट झाले. विकास मागच्या दोनवर्षांपासून तुरुंगात आहे. या प्रकरणी तपास पूर्ण झाला असून पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे असे न्यायाधीशांनी सांगितले. या प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती पाहिली तर आरोपीला जामीन मिळाला पाहिजे असे न्यायाधीशांनी सांगितले.

पीडित मुलीने विकासवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर त्याला मार्च २०१६ मध्ये अटक झाली. आरोपीने आपल्यावर प्रेम व्यक्त केले व शरीरसंबंधं ठेवण्यासाठी त्याच्या घरी घेऊन गेला. आरोपीने लग्नाचे आश्वासन दिले व पुन्हा शरीरसंबंध ठेवले असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले होते. या संबंधातून ती मुलगी गर्भवती राहिली व जून २०१६ मध्ये तिने अर्भकाला जन्म दिला. ठाणे सत्र न्यायालयाने दोन वेळा आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी आरोपीला पीडित मुलीच्या गावात जाण्यावर बंदी घातली आहे.