पोलीस उपमहासंचालक सुनील पारसकर यांच्यावर विनयभंग आणि बलात्काराचे आरोप करणारी मॉडेल आणि पारसकर यांच्यातील इमेल संभाषण उघडकीस आले आहे. यातील चार इमेलकडे लक्ष दिले असता पारसकरांची जवळीक आणखी एका मॉडेल-अभिनेत्रीशी होती. या जवळीकीतूनच पारसकर यांची तक्रार करणाऱ्या मॉडेलने गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एका तक्रारीचे तपशील प्रसारमाध्यमांना उघड केले. त्यामुळे या मॉडेलला राग आला होता, असे स्पष्ट होत आहे.
संबंधित मॉडेलच्या नावाने एक बनावट फेसबुक पेज उघडून त्यावरून शरीरविक्रीचा धंदा सुरू होता. या मॉडेलने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मात्र या तक्रारीबाबत प्रसारमाध्यमांना पारसकर यांनीच माहिती दिल्याचे या मॉडेलने एका इमेलमध्ये म्हटले आहे. तुमच्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला आहे, या धक्क्यातून मी सावरू शकत नाही, असे या मॉडेलने  इमेलमध्ये लिहिले आहे. तर पारसकर यांनी एका इमेलला उत्तर देताना, ‘मी खोटे बोलत असेन, तर मला तुझ्या आईचे शाप आणि तुझेही तळतळाट लागतील,’ असे म्हटले आहे.
पारसकर आणि एक वादग्रस्त मॉडेल यांचे घनिष्ट संबंध होते. तक्रारदार मॉडेलला हे संबंध पसंत नव्हते. दुसऱ्या मॉडेलशी संबंध ठेवून तुम्ही मला दुखावले आहे, असे तिने लिहिले आहे. तर या इमेलला उत्तर देताना, ‘एका पोलीस अधिकाऱ्याने भावुक होणे योग्य नाही. तरीही मी भावनांच्या पोटी तुला खूप मदत केली आहे. शरीरविक्रीच्या प्रकरणात तुझ्या आईला आणि भावाला जराही तोशीस लागू दिली नाही. तरीही माझी जवळीक दुसऱ्याच मॉडेलशी आहे, असे तुला का वाटते? मला तुझ्याबद्दल आदर आहे. तू शिव्याशाप दिलेस, तरी माझे तुझ्याबद्दलचे मत बदलणार नाही,’ असे लिहिले आहे.