बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना मॉडेलच्या एका ध्वनिफितीमुळे दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पारसकर यांना नोटीस पाठविणाऱ्या मॉडेलने आपल्या वकिलासोबत केलेल्या संभाषणाच्या ध्वनिफितीत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा फायदा तपासादरम्यान त्यांना मिळण्याची शक्यता आहे. या ध्वनिफितीच्या जोरावरच पारसकर यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे.
पारसकर यांच्याविरुद्ध विनयभंग आणि बलात्काराचा आरोप करणाऱ्या मॉडेलने पारसकर यांना दोन नोटिसा पाठविल्या होत्या. परंतु पहिली नोटीस पत्ता चुकीचा असल्यामुळे पारसकर यांना मिळाली नव्हती. त्यात या मॉडेलने विनयभंग व बलात्काराचा कुठलाही उल्लेख केला नव्हता. किंबहुना या बाबत वकिलाशी बोलताना तिने पारसकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यावेळीही तिने आपला विनयभंग वा बलात्कार झाल्याचा उल्लेख केला नव्हता. ही ध्वनिफीतच तपास अधिकाऱ्यांना सादर झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास कुठल्या दिशेने जातो, याबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
‘बिग बॉस’च्या नव्या सीझनमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या या मॉडेलने पारसकर प्रकरणाचा वापर करून घेतल्याचीही आता चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात एका पत्रकाराचेही नाव पुढे येत आहे. या पत्रकारानेही मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न केल्याचे संबंधित मॉडेलचे म्हणणे आहे. मात्र पारसकर यांनी आपल्यावर बलात्कार केला, यावर संबंधित मॉडेल ठाम असून याबाबत पुरावे देण्याची तयारीही तिने दाखविली आहे, अशी माहिती तपासाशी संबंधित सूत्रांनी दिली.