राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आज या विषयावर माध्यमांशी बोलताना राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही असे सांगितले.

“धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. त्या संदर्भात त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावी एवढी अपेक्षा होती, पण ती पावलं उचलली गेली नाहीत, त्यामुळे धनंजय मुंडे हायकोर्टात गेले” असे जयंत पाटील यांनी सांगितले.

आणखी वाचा- धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या ‘त्या’ महिलेकडून मलाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न – भाजपा नेते कृष्णा हेगडे

“पोलिसांना तपास करुं दे. त्यातून योग्य तो निष्कर्ष निघेल. आपण निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची घाई करु नये. पोलीस योग्य ती पावले उचलतील. आम्ही पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप करणार नाही” असे जयंत पाटील यांनी सांगितले.

आणखी वाचा- “हीच योग्य वेळ आहे”; धनंजय मुंडे प्रकरणी प्रकाश आंबेडकरांच सूचक भाष्य

“या प्रकरणात एक महिला वाट्टेल ते आरोप करुन, राजकीय व्यक्तीमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय. त्याची योग्य ती दखल आपण घ्याल” असा विश्वास जंयत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

“धनजंय मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्याबाबत वस्तुस्थिती समजून पोलिसांकडून योग्य पावले उचलण्यात येतील. कोणी कोणावर आरोप केले म्हणून लगेच कोणतीही शहानिशा न करता पक्षाने कारवाई करणे योग्य नाही” असे जयंत पाटील म्हणाले.