एके काळी महिला सुरक्षेच्या बाबतीत देशातील इतर शहरांपेक्षा सुरक्षित असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या मुंबईची मान हळूहळू शरमेने खाली झुकत चालली आहे. एका ओसाड मिलच्या आवारात छायाचित्रकार मुलीवर पाच नराधमांनी दिवसाढवळ्या बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून, चाकूच्या धाकाने धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी घाटकोपरमधील २३ वर्षांच्या एका भाजीविक्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना महिन्याभरापूर्वी घडली होती. याबाबत पंतनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास चालू आहे.
घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगरातील एका चाळीत राहणारा निखिलेश मौर्या हा २३ वर्षांचा तरुण पंतनगर येथे भाजी विक्रीचा धंदा करतो. १७ वर्षांची पीडित मुलगी ही त्याच्या शेजारच्याच घरात राहते. या मुलीचे पालक घराजवळच खाद्यपदार्थाची गाडी चालवतात. त्यासाठी ते सकाळी लवकर घराबाहेर पडतात. मौर्याने तिच्या पालकांच्या दैनंदिन व्यवहाराची सर्व बित्तंबातमी मिळवून पद्धतशीरपणे हा बलात्कार केल्याचे समोर आले आहे.
गेल्या महिन्यात, २५ जुलै रोजी या मुलीचे पालक सकाळी लवकर घराबाहेर पडल्याचे पाहून निखिलेशने सकाळी साडेसहाच्या सुमारास तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. काहीतरी विसरल्याने पालकच घरी आले असावेत, असे समजून या मुलीने दरवाजा उघडला. त्या वेळी निखिलेश पीडित मुलीच्या घरात घुसला. या दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले संबंध असल्याने मुलीनेही त्याला घरात घेतले. मात्र घरात घुसताच निखिलेशने चाकूचा धाक दाखवत मुलीवर बलात्कार केला. तसेच याबाबत वाच्यता करशील, तर जिवानिशी ठार मारेन, अशी धमकीही त्याने तिला दिली. विशेष म्हणजे मौर्याची बायको बाळंतपणासाठी तिच्या माहेरी गेली असताना त्याने हे कृत्य केले.
या घटनेचा धसका घेतल्याने मुलगी अबोल झाली. तब्बल महिनाभर मुलगी व्यवस्थित बोलत नाही, अनामिक दडपणाखाली असते, हे लक्षात आल्यानंतर तिच्या आईने चौकशी केली. त्या वेळी महिनाभर अबोल असलेली ही मुलगी भडाभडा रडू लागली. त्यानंतर तिने सांगितलेली ही कहाणी ऐकून तिच्या आईवडिलांना धक्का बसला. त्यांनी त्वरीत पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेत मौर्याविरोधात तक्रार नोंदवली.पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत मौर्याला अटक केली आहे. पीडित मुलगी आणि मौर्या या दोघांचीही वैद्यकीय तपासणी झाली असून पोलीस या प्रकरणी अधिक माहिती आणि पुरावे गोळा करीत आहेत. पोलिसांनी मौर्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ३० ऑगस्टपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गोरेगाव स्थानकात तरुणीवर प्राणघातक हल्ला
गोरेगाव रेल्वे स्थानकात गाडीची वाट पाहणाऱ्या एका तरुणीवर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला करण्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या व्यक्तीने ऐन गर्दीच्या वेळी या तरुणीला लक्ष्य करत तिच्यावर एका टणक वस्तूने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीच्या डोक्याला दुखापत झाली असून तिला नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वसई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वसई पोलीस ही तक्रार बोरिवली पोलिसांकडे वर्ग करण्याची शक्यता आहे.
नालासोपारा येथे राहणारी रुपाली शिंदे ही तरुणी घरी जाण्यासाठी गोरेगाव स्थानकावर गाडी पकडण्यासाठी उभी होती. संध्याकाळी ७.४५ वाजता, ऐन गर्दीच्या वेळी एका अज्ञात इसमाने मागून रुपालीवर हल्ला केला. या व्यक्तीने एका टणक वस्तूने रुपालीच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात रुपालीच्या डोक्याला दुखापत झाली. मात्र तिने रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल न करता नालासोपारा येथे जाणे पसंत केले.
नालासोपारा येथे पोहोचल्यानंतर रुपालीला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिला झालेली दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यानंतर या प्रकरणी वसई पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही तक्रार आता बोरिवली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.