मामा आणि मावस भावाने आपल्यावर तब्बल नऊ वर्ष बलात्कार केल्याचा आरोप ग्रॅन्ट रोड येथील एका महिलेने केला आहे. याप्रकरणी दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित सुर्वे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ग्रॅन्ट रोड येथे राहणाऱ्या या ३४ वर्षीय महिलेने शुक्रवारी संध्याकाळी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. २००१ ते २००९ या काळात तिचा मामा सतीश कोंडेकर (४५) आणि मावस भाऊ राजेश कडव (३५) हे दोघे तिच्यावर वारंवार बलात्कार करीत होते. या महिलेचे आई-वडिल नसल्याने ती या दोघांसोबत रहात होती. २००९ मध्ये तिचे लग्न झाले आणि तिची सुटका झाली. पंरतु काही दिवसांतच नवऱ्याशी न पटल्याने ती घरी परत आली. त्यावेळी त्यांनी पुन्हा तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. आता ती रहात असलेल्या घरातून तिला हाकलून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांविरोधात बलात्काराचा, तसेच वेश्या व्यवसाय प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला आहे.