मुंब्रा येथील अमृतनगर भागातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मुंब्रा पोलीस ठाण्यातील इरफान खान आणि कौशल काकडे या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांची नावे पुढे आली असून त्यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी त्यांची सविस्तर चौकशी सुरू असल्याने त्यांच्यावर अद्याप अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून या सर्वानी तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
मुंब्रा परिसरात तीन महिन्यांपूर्वी पीडित मुलगी गुंगीच्या अवस्थेत एका सामाजिक संस्थेला सापडली होती. या संस्थेने या मुलीची चौकशी केली असता, त्यामध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या वेळी पीडित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तिच्या सावत्र बापास पोलिसांनी यापूर्वीच अटक केल्याचे उघड झाले होते. तसेच देहविक्रीचा व्यवसाय चालविणाऱ्या नराधमांनी तिची पैसे घेऊन विक्री केल्याचे आणि यातूनच सहा आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती तिच्या चौकशीतून पुढे आली होती. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंब्रा पोलिसांची टाळाटाळ
विशेष म्हणजे, या बलात्कार प्रकरणात मुंब्रा पोलीस ठाण्यातील इरफान खान आणि कौशल काकडे या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांची नावे पुढे आली होती. त्यामुळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी संबंधित सामाजिक संस्थेने केली होती. मात्र, मुंब्रा पोलिसांनी टाळाटाळ केल्याने अखेर सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांची भेट घेऊन त्यांना या घटनेविषयी माहिती दिली होती. त्यानंतर लक्ष्मीनारायण यांनी आदेश देताच  दोघा पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी पोलीस अद्याप मोकाटच
मात्र, या दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसेच या प्रकरणी दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.