तीन वर्षांंपूर्वी बलात्काराच्या आरोपावरून अटक झालेले आणि तेव्हा पक्षातून निलंबित करण्यात आलेले पाचोऱ्याचे आमदार दिलीप वाघ यांना राष्ट्रवादीने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाने १३१ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, उमेदवारीवरून पक्षात प्रचंड गोंधळ झाल्याचे समजते.
नोकरी देतो असे सांगून  दिलीप वाघ आणि त्यांच्या सचिवाने एका युवतीवर बलात्कार केला होता. यावरून वाघ यांना अटकही झाली होती. बलात्काराचा आरोप झाल्याने पक्षाने त्यांना तेव्हा निलंबित केले होते. वाघ यांना तेव्हा अटक झाली होती, पण त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. यामुळेच त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
पक्षाने ४० विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातील २१ पैकी फक्त चारच मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पुण्यात उमेदवारीवरून प्रचंड गोंधळ असल्याने नावे जाहीर करण्याचे पक्षाने टाळले आहे. काँग्रेसने उमेदवारी नाकारलेले पैठणचे आमदार संजय वाघचौरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि अगदी कालपर्यंत पक्षाच्या मुख्यालयात सक्रिय असलेले बसवराज पाटील नागराळकर यांना निलंग्यातून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली.  
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याऐवजी पुतणे अवधूत, आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्याऐवजी  पुत्र वैभव, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्याऐवजी त्यांच्या पुत्राला उमेदवारी देण्यात आली आहे. केजमध्ये माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या सुनेला उमेदवारी देण्यात आली. छगन भुजबळ (येवला) आणि त्यांचे पुत्र पंकज (नांदगाव) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबईतील ३६ पैकी सहाच मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. पक्षाला मुंबईत सर्व मतदारसंघांमध्ये प्रभावी उमेदवार मिळत नसल्याचे सांगण्यात आले. सचिन अहिर, नवाब मलिक, मिलिंद कांबळे या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. मुंबईचे अध्यक्ष संजय दिना पाटील यांना विक्रोळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रसाद लाड (सायन-कोळीवाडा), नरेंद्र वर्मा ( वर्सोवा) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गणेश नाईक व जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांसह  निरंजन डावखरे (ठाणे), संदीप नाईक (ऐरोली), गिल्बर्ट मेंन्डोसा (भाईंदर), हणुमंत जगदाळे (ओवळा-माजिवडा), निलेश शिंदे (कल्याण पूर्व), संजय पाटील (कल्याण पश्चिम), अब्दुल ताहीर मोमिन (भिवंडी पश्चिम) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.