नवी मुंबई येथील  तुर्भे भागातील एका २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी खाजप्पा नागनाथ नडगम (३२) यास ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी सात वर्षे सक्तमजुरीची आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
नवी मुंबई येथील एमआयडीसी परिसरात पीडित तरुणी राहत होती.
१ ऑक्टोबर २०११ रोजी तिची आई कामावर गेली होती. त्या वेळी घरात एकटी असल्याची संधी साधत खाजप्पा याने तिच्यावर बलात्कार केला होता. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी खाजप्पाला पकडून तुर्भे पोलिसांच्या हवाली केले होते.
या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणाची अंतिम सुनावणी न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांच्यासमोर झाली. या प्रकरणात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले, तसेच सरकारी वकील अशोक खामकर यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला. न्यायालयात सादर करण्यात आलेले साक्षी-पुरावे ग्राह्य़ मानून न्यायाधीश विरकर यांनी खाजप्पा यास सात वर्षे सक्तमजुरीची आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.