चेंबूरमध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा बुधवारी औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणात चुनाभट्टी पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र महिन्याभरानंतरही पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही. त्यामुळे तरुणीच्या नातेवाईकांनी गुरुवारी चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर जोरदार निदर्शने केली.

मूळची जालना जिल्ह्य़ातील ही तरुणी काही महिन्यांपूर्वी चेंबूरच्या लालडोंगर परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाकडे आली होती. ७ जुलैला ती मैत्रिणीसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली असता तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला. घरी परतल्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने तिच्या भावाने ही बाब आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी चेंबूरमध्ये येऊन मुलीला गावी नेले. तिथे एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर बलात्कार झाल्याचे उपचारादरम्यान उघड झाले.

याबाबत मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून औरंगाबाद येथील बेगमपुरा पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत, २ ऑगस्टला हा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग केला. त्यानंतर गेल्या महिन्याभरात पोलिसांकडून एकाही आरोपीला अटक झालेली नाही. केवळ तपासच सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. मात्र उपचार सुरू असताना बुधवारी या तरुणीचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या तिच्या नातेवाईकांनी गुरुवारी चुनाभट्टी पोलीस ठाण्याला घेराव घातला. आम्ही पोलिसांना आरोपींबाबत सर्व माहिती दिलेली असताना, पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नसल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असून आरोपींबरोबरच या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे.

राष्ट्रवादीचा आज मोर्चा

गुन्हा दाखल होऊन महिना होत असताना चुनाभट्टी पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही. याबाबत पोलिसांना जाब विचारण्यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादीकडून चेंबूर लालडोंगर ते चुनाभट्टी पोलीस ठाणे असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक हे करणार आहेत.