राज्यात गेल्या दोन वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये तब्बल ७० टक्यांची वाढ झाली असून त्यातील ९५ टक्के घटना परिचितांकडूनच घडल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरावरून उघड झाली आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत रामहरी रूपनवार व अन्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावरील उत्तरात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, सन २०१२ च्या तुलनेत २०१३ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्य़ांमध्ये ६३.२६ टक्के वाढ झाली. तर सन २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये त्यात ७.५१ टक्केची भर पडली. सन २०१३ मध्ये झालेल्या एकूण बलात्काराच्या घटनांमधील पीडितांमध्ये १० वर्षांच्या आतील मुलींची संख्या १६१ असून सन २०१२ मध्ये ९५.५६ तर सन २०१३मध्ये ९४.४३ टक्के बालात्कार हे पीडितांच्या परिचितांकडूनच झाल्याची बाबही समोर आली आहे. माहिलांवरील अत्याचाराची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी नव्याने जलदगती न्यायालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजना  सुरू करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.