03 June 2020

News Flash

मुंबई ते अमरावती.. रक्ताचा थरारक प्रवास!

शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती.

(संग्रहित छायाचित्र)

दुर्मीळ रक्ताचा पुरवठा करून रुग्णाचा जीव वाचवला
ऐन संकटसमयी रक्ताची माणसेही उपयोगी पडत नाही, असा अलीकडच्या काळातला अनुभव. पण आत्मकेंद्री होत चाललेल्या या समाजात आजही माणुसकी, भावनेची ओल शिल्लक असल्याचे अधूनमधून समोर येत असते. असाच अनुभव अमरावतीतील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या सावित्रीबाईंना आला. अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘बॉम्बे’ रक्तगटाच्या दात्याची त्यांना गरज होती. पण ते सहजशक्य नव्हते. अशा वेळी अचानक चार अनोळखी, परस्परांनाही फारशी परिचित नसलेली माणसे एकत्र आली आणि त्यांनी मुंबईहून अमरावतीपर्यंत धावपळ करीत सावित्रीबाईंपर्यंत रक्त पोहोचवले.
अमरावतीपासून पन्नास किलोमीटरवर असलेल्या अचलपूर येथे राहणाऱ्या सावित्रीबाई (नाव बदललेले) यांना प्रकृती बिघडल्यामुळे अमरावती येथील पंजाबराव देशमुख रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. परंतु सावित्री यांचा रक्तगट ‘बॉम्बे’ हा अतिशय दुर्मीळ रक्तगट असल्याने या रक्तगटाचा दाता शोधायचा कुठून, असा पेच रुग्णालयाच्या डॉक्टरांना पडला. अशा वेळी सावित्री यांच्या पतीचे मित्र राहुल कडू यांनी मुंबईतील आपल्या एका मित्राशी संपर्क साधून हा रक्तगट उपलब्ध होऊ शकतो का, अशी विचारणा केली. या मित्रानेही तातडीने जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधला. रविवार असूनही डॉ. लहाने यांनी स्वत: या रक्तगटासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फोन केले. परंतु या दुर्मीळ रक्तगटाचा दाता कुठेच उपलब्ध नव्हता. अशात ‘थिंक फाऊंडेशन’च्या विनय शेट्टी यांच्या माध्यमातून सानपाडा येथे राहणाऱ्या निहार दीक्षित या तरुणाशी संपर्क झाला. आयटी कंपनीत काम करणाऱ्या निहारचा रक्तगट ‘बॉम्बे’ आहे. रुग्णाची परिस्थितीत कळताच तोही रक्तदान करण्यास लगेच तयार झाला. त्याने विनय शेट्टी यांच्यासोबत तातडीने जे. जे. रुग्णालयाची रक्तपेढी गाठली. तेथील डॉक्टरांनी तातडीने चाचणी होऊन रक्त उपलब्ध होण्यासाठी जे.जे.मधीलच महानगर रक्तपेढीत जाण्यास सांगितले. रुग्णालयातील निवासी डॉक्टर प्रसन्ना लोध यांनीही जातीने सर्व मदत उपलब्ध करून दिली. रक्तदान केल्यानंतर अमरावतीपर्यंत रक्त नेण्यासाठी आइस बॉक्स देण्यात आला.
हे सर्व सुरू असतानाच रक्ताची पिशवी अमरावतीला पोहोचवणारी व्यक्ती ऐन वेळी येऊ शकली नाही. अशावेळी जे. जे. कला महाविद्यालयातून पदवी घेतलेले प्रशांत अनासने यांनी आपल्या मित्राची कार मिळवली आणि सोमवारी दुपारी जे.जे. रुग्णालयातून हे रक्त अमरावतीला नेण्यात आले. सलग बारा तास गाडी चालवून मंगळवारी अमरावतीमधील पंजाबराव देशमुख रुग्णालयात जेव्हा ही रक्ताची पिशवी आणण्यात आली तेव्हा तेथील डॉक्टरांचा यावर विश्वास बसला नाही. आमच्याकडून कोणताही चिठ्ठी नसताना रक्त मिळालेच कसे असा प्रश्न त्यांनी कडू यांना केला. मात्र डॉ. लहाने यांनी कागदपत्रांची पूर्तता नंतरही होऊ शकते. रुग्णांचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका घेतल्यामुळेच हे रक्त मिळाल्याचे कडू यांनी सांगितले आणि डॉक्टरांनी तात्काळ सावित्रीबाईंना रक्त दिले. ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता, अशी अनेक माणसे या प्रकरणात एकत्र आली आणि वेळेत रक्त मिळू शकले, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

बॉम्बे रक्तगट दुर्मीळ
संपूर्ण देशात या रक्तगटाचे अवघे तीनशे रक्तदाते आहेत. महाराष्ट्रात सुमारे सव्वाशे रक्तदाते असून यापैकी सुमारे ५५ रक्तदातेच नियमित रक्तदान करतात, असे थिंक फाऊंडेशनच्या विनय शेट्टी यांनी सांगितले. या रक्तगटाची गरज असल्यास देशाच्या वेगवगळ्या राज्यांमधून त्यांच्या संस्थेला दूरध्वनी केले जातात. २००६ पासून रक्तदान व थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी ही संस्था काम करीत आहे. केईएममध्ये १९५२ साली डॉ. वाय. एम. भेंडे, डॉ. सी. के. देशपांडे व डॉ. एच. एम. भाटिया यांनी या रक्तगटाचा शोध लावला. याची माहिती लॅन्सेट या जगप्रसिद्ध मासिकात प्रसिद्ध झाल्यानंतर हा रक्तगट (एबीओ एच अ‍ॅण्टिजेन नललेला) ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
संदीप आचार्य, 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2016 3:02 am

Web Title: rare blood send from mumbai to amravati
Next Stories
1 ‘मार्ग यशाचा’मधून विद्यार्थ्यांना करिअरचा मंत्र
2 काहिली ओसरणार
3 गांधी-आंबेडकर वादाचा ‘सफाई’त समन्वय
Just Now!
X