राखीव निधीची पूर्ण रक्कम अद्याप नाही; दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन रखडण्याची शक्यता

मुंबई-महाराष्ट्रासह देशाचे वैभव आणि सांस्कृतिक-वैचारिक समृद्धीचे ज्ञानभांडार असलेले ‘एशियाटिक ग्रंथालय’ सध्या आर्थिक विवंचनेत सापडले आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडून एशियाटिक ग्रंथालयाला मिळणाऱ्या ५० कोटी रुपयांच्या राखीव निधीची  (कॉर्पस फंड) संपूर्ण रक्कम ग्रंथालयाला अद्याप मिळाली नसल्याचे एशियाटिक ग्रंथालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शासनाकडून एशियाटिक ग्रंथालयाला २०१५-१६ या वर्षांत पाच कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती. या मदतीतून दुर्मीळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनचे काम हाती घेण्यात आले. ग्रंथालयातील सुमारे ८० हजारांपैकी २३ हजार दुर्मीळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात २५ हजार पुस्तकांचे डिजिटायझेशन केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नाही तर हे काम रखडण्याची शक्यता ‘एशियाटिक ग्रंथालया’च्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी दोन वर्षांपूर्वी एशियाटिक सोसायटी आणि ग्रंथालयाला भेट दिली होती. त्या भेटीनंतर उपराष्ट्रपतींनी दिलेल्या निर्देशानुसार केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाची समिती स्थापन करण्यात आली. एशियाटिक ग्रंथालयासाठी राज्य शासनाकडून २० कोटी आणि केंद्र शासनाकडून ३० कोटी रुपये असा एकूण ५० कोटी रुपयांचा राखीव निधी (कॉर्पस फंड) देण्याची सूचना समितीने केली होती. त्यानुसार केंद्र शासनाकडून पाच कोटी रुपये मिळाले. पण उर्वरित २५ कोटी तसेच राज्य शासनाकडून अपेक्षित असलेले २० कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. राज्य शासनाचे आर्थिक अंदाजपत्रक आता लवकरच सादर केले जाईल. त्यात ग्रंथालयाला मिळणाऱ्या आर्थिक अनुदानाची तरतूद केली जावी, अशी या सूत्रांची अपेक्षा आहे. राज्य व केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या राखीव निधीची पूर्ण रक्कमही लवकरात लवकर मिळण्यासाठी एशियाटिक ग्रंथालयाने संबंधितांकडे पत्रव्यवहारही केला असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

‘टीसीएस’कडून ग्रंथालयाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असून त्यातून दरबार हॉलचे नूतनीकरण करण्यात आले. मारिवाला फाउंडेशन आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या देणगीतून एशियाटिक ग्रंथालयात उद्वाहन बसविण्यात आले. या उद्वाहनामुळे ग्रंथालयात येणारे ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग व्यक्तींची सोय झाली. रोटरी क्लबने पुस्तकांचे जतन करण्यासाठी कक्ष बांधून दिला असल्याकडेही  सूत्रांनी लक्ष वेधले.

एशियाटिक ग्रंथालयात अद्याप अनेक दुर्मिळ व चिरंतन मूल्य असलेली ग्रंथसंपदा आहे. त्याचे डिजीटायझेशन अद्याप पूर्ण झालेले नाही. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पुस्तकांचे काम पूर्ण केले जाणार आहे. या कामासाठी राज्य शासनासह दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून आर्थिक मदत मिळावी.  शरद काळे, अध्यक्ष, एशियाटिक सोसायटी