विरारमध्ये कावळ्यांच्या तावडीत अडकलेल्या जखमी ब्राउन बुबी सागरी पक्षाला प्राणीमित्राकडून जीवदान मिळाले आहे. हा पक्षी दुर्मिळ असून अटलांटिक व पॅसिफिक महासागर किनाऱ्यावर तो आढळतो. प्राणीमित्र सुरज पांडे या तरुणाला हा पक्षी विरार पूर्वेच्या जीवदानी परिसरात कावळ्यांच्या तावडीत असताना आढळला होता. यानंतर या पक्षाची सुखरूप सुटका करण्यात आली. लवकरच त्याला नालासोपारा येथील रिसर्च सेंटरला पाठवण्यात येणार आहे.

अटलांटिक आणि पॅसिफिक बेटांवर आढळणारे बूबी हे पक्षी प्रजनन काळात त्यांच्या विणीचा हंगाम घालवतात. ते जुलै महिन्यात हवामानानुसार समुद्री सफरीसाठी बेटांवर येत असतात. त्यांचे प्रमुख अन्न मासे असून त्यांच्या चोचीच्या दोन्ही आतल्या कडा करवतीसारख्या असता व त्या आतील बाजुला वळलेल्या असतात. त्यामुळे एकदा का मासा या पक्षाच्या  चोचीत आला की, तो पोटातच जातो.

हे पक्षी आकाशातून माशांवर थेट झडप घालतात, त्यामुळे त्यांच्या नाकपुड्यांचीही विशिष्ट रचना असते. विरारमध्ये आढळलेला पक्षी हा कमजोर अवस्थेत असल्याने तो पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ब्राउन बुबी हा पश्चिम किनारपट्टी भागात कमी प्रमाणात आढळणारा पक्षी असल्याचे पक्षीप्रेमी सांगत आहेत.