हिवाळा म्हटले की आपल्यासाठी आल्हाददायक गारवा असला तरी उत्तरेत मात्र गारठून टाकणारी थंडी असते. ही थंडी चुकवण्यासाठी मग शेकडो प्रकारचे पक्षी हजारो किमोमीटरचे अंतर पार करून दक्षिण दिशेला येतात. मुंबईत सध्या वैशिष्टय़पूर्ण पक्ष्यांचे संमेलन भरले आहे. या पक्ष्यांमध्ये काही नवीन आणि दुर्मीळ पाहुणेही दिसू लागले आहेत. यापकी एक म्हणजे युरेशियन थीक नी. हा पक्षी अनेक वर्षांनी मुंबईत पाहायला मिळत आहे. या चार पक्ष्यांनी महाराष्ट्र निसर्ग उद्यानात वस्ती केली आहे.

हिवाळ्यातील स्थलांतरित पक्षी म्हटले की प्रत्येकाला आठवतात ते गुलाबी पंख पसरून दिमाखात उडणारे फ्लेिमगो म्हणजे रोहित पक्षी. आकार आणि रंगामुळे फ्लेिमगो साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असले तरी त्यांच्या अस्तित्वामुळे इतर अनेक स्थलांतरित पक्ष्यांची दखलच घेतली जात नाही. मात्र आपल्या विविध वैशिष्टय़ासह येणारे हे पक्षी पर्यावरणाच्या समतोलाचे मापक ठरतात.

पाणथळ जमिनीवर, खुरटय़ा झाडांमध्ये हा पक्षी वास्तव्य करतो. गवतातील किडे, बिया हे त्याचे अन्न. साधारण फूटभर उंचीच्या या पक्ष्याचे पाय पाणथळ जमिनींसाठी योग्य असतात. उंच पायाच्या या पक्ष्याच्या गुडघ्याचा भाग जाड असल्याने त्याला थीक नी नाव पडले आहे. सर्वसाधारण पक्ष्यांप्रमाणे संध्याकाळी किंवा भल्या पहाटे हे पक्षी अन्नाच्या शोधात भटकत असतात. उन्हात मात्र ते एका ठिकाणी बसून राहतात. महाराष्ट्र निसर्ग उद्यानात गेले काही दिवस चार पक्षी आले आहेत. पाण्याच्या जवळ असलेल्या या उद्यानात आता ते स्थिरावले आहेत, अशी माहिती निसर्ग उद्यानाचे उपसंचालक अविनाश कुबल यांनी दिली.

युरेशियन थीक नी

सध्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात दिसत असलेला युरेशियन थीक नी हा पक्षी याच प्रकारातील आहे. दक्षिण युरोपातील हा पक्षी थंडीमध्ये भारताच्या उत्तर भागात येतो व उन्हाळा सुरू होता होता आपल्या मूळ जागी परत जातो. राजस्थान, हरयाणा, उत्तराखंडमध्ये हा अनेकदा दिसतो. मात्र महाराष्ट्र किंवा मुंबईत त्याचे दर्शन दुर्लभ म्हणावे असे. मुंबईत तो १९६९ मध्ये दिसल्याची नोंद पक्षीतज्ज्ञ हुमायू अब्दुलाली यांनी केली आहे. मात्र त्यानंतर या पक्ष्याची नोंद झालेली नव्हती. आता मात्र पुन्हा एकदा मुंबईकरांना या पक्ष्याचे दर्शन झाले आहे.