12 December 2018

News Flash

कर्करोगाच्या शर्यतीत कासवच जिंकले.!

१९५१मध्ये मुंबईतील डी. बी. तारापोरवाला यांनी दिलेल्या देणगीतून मत्स्यालयाची उभारणी करण्यात आली

मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयातील सुमारे ४५ वर्षांचे सर्वात जुने ‘हॉक्सबिल’ प्रजातीचे दुर्मीळ कासव सध्या फारच आजारी आहे

तारापोरवाला मत्स्यालयातील आजारी कासवाच्या प्रकृतीत सुधारणा; डोक्यावरील कर्करोगजन्य गाठीवर शस्त्रक्रिया

बच्चे कंपनीबरोबरच देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ असणाऱ्या मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयातील सुमारे ४५ वर्षांचे सर्वात जुने ‘हॉक्सबिल’ प्रजातीचे दुर्मीळ कासव सध्या फारच आजारी आहे. या कासवाच्या डोक्यावरील कर्करोगजन्य गाठीवरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. मात्र आजाराचे स्वरूप पाहता यापुढे हे कासव प्रदर्शनाकरिता न ठेवण्याच्या निर्णय मत्स्यालय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या सर्वात जुन्या कासवाला पाहण्याची संधी यापुढे पर्यटकांना मिळणार नाही.

१९५१मध्ये मुंबईतील डी. बी. तारापोरवाला यांनी दिलेल्या देणगीतून मत्स्यालयाची उभारणी करण्यात आली, तर २० कोटी रुपये खर्चून नुकतेच मत्स्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र मत्स्यालयाचा खऱ्या अर्थाने ठेवा असलेले हॉक्सबिल प्रजातीचे ६० किलो वजानाचे सर्वात जुने मादी कासव आजारी आहे. मरीन ड्राइव्हच्या समुद्रकिनाऱ्यालगत मत्स्यालयाची इमारत असल्याने मासेमारी करताना जाळ्यात सापडलेले असंख्य दुर्मीळ सागरी जीव स्थानिक मच्छीमार बांधव मत्स्यालय प्रशासनाकडे सुपूर्द करत असतात. २५ वर्षांपूर्वी असेच जाळ्यात सापडलेले हे मादी कासव कुलाबा येथील एका मच्छीमाराने मत्स्यालयात आणून सोडले होते. तेव्हापासून मत्स्यालय प्रशासन या कासवाचा सांभाळ करीत आहे.

एप्रिल २०१७ मध्ये या कासवाच्या डाव्या डोळ्याजवळ गाठ आल्याचे मत्स्यालयातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पशुवैद्यक डॉ. दिनेश विन्हेरकर यांच्या निरीक्षणाखाली या कासवावर उपचार सुरू केले. या गाठीचे निदान केल्यानंतर ती कर्करोगजन्य फायब्रोमा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कासवाची शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली. मात्र गाठीची पुन्हा वाढ झाल्याने टाटा कर्करोग रुग्णालयाचे पशुवैद्य डॉ. चौधरी आणि डॉ. विन्हेरकर यांच्या निरीक्षणाखाली जानेवारी महिन्यात दुसरी शस्त्रक्रिया करून गाठ पूर्णत: काढण्यात आली, अशी माहिती साहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी निखिल नागोठकर यांनी दिली,

तसेच सद्य:स्थितीत कासव नियमित अन्नग्रहण करत असल्याचेही त्यांना सांगितले. मात्र या कासवाच्या प्रकृतीचा एकूण अंदाज घेऊन आणि गाठीचा संसर्ग पुन्हा न बळावण्याच्या दृष्टीने कासवाला यापुढे प्रदर्शनाकरिता न ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

‘गेली पंचवीस वर्षे या कासवाचा सांभाळ करत असून ते खऱ्या अर्थाने मत्स्यालयात येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. मात्र यापुढे या कासवाला प्रदर्शनाकरिता न ठेवण्याचा निर्णय घेतला असून एका स्वतंत्र्य कक्षात त्याची काळजी घेतली जाईल,’ असे मत्स्यालयाचे अभिरक्षक अजिंक्य पाटील यांनी सांगितले.

हॉक्सबिल कासवाची वैशिष्टय़े

* रंगीबेरंगी कवचामुळे हॉक्सबिल हे सागरी कासव सर्वाधिक सुरेख दिसते.

* ते दुर्मीळ आहे. छोटे, अरुंद डोके आणि पक्ष्याच्या तीक्ष्ण चोचीसारखे निमुळते तोंड यामुळेच त्याला हॉक्सबिल म्हटले जाते.

* समुद्रात प्रवाळभित्ती, खडकाळ तळ असलेली क्षेत्रे, कच्छतर, सागरी बेटांवर प्रामुख्याने ही कासवे आढळतात.

* ४५ -९० किलोग्रॅमपर्यंत वजन आणि अर्धा ते एक मीटर लांब असे हे समुद्री कासव आहे. हे कासव साधारण १२५ वर्षे जगते.

मत्स्यालयातील सर्वात जुन्या कासवाच्या आजाराचे निदान झाले असून त्याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. त्याच्या डोक्यावरील फायब्रोमा काढण्यात आला आहे. सद्य:स्थितीत कासवाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला पुन्हा समुद्रात सोडणे शक्य नाही. कारण गेली कित्येक वर्षे हे कासव बंदिस्त स्वरूपात राहिले आहे. ज्या वेळी एखादा प्राणी खूप वर्ष बंदिस्त राहतो तेव्हा त्याची नैसर्गिक अधिवासात जगण्याची शक्ती कमी होते. त्यामुळे या कासवाला पुन्हा समुद्रात सोडणे योग्य नाही.

– डॉ. दिनेश विन्हेरकर, पशुवैद्य

First Published on March 14, 2018 3:25 am

Web Title: rare hawksbill turtle recovered from cancer disease