लेफ्टनंट कमांडर टॉड यांना मुंबईत कांदिवली आणि नंतर बोरिवली येथे अश्महत्यारे सापडल्यानंतर पुरातत्त्व क्षेत्रामध्ये त्याचा बराच गवगवा झाला. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अश्मयुगाचे जे तीन पुरापाषाणयुग, मध्याश्मयुग आणि नवपाषाणयुग हे महत्त्वाचे टप्पे मानले जातात. (आता या तीनमध्ये आणखीही काही टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण या लेखापुरता केवळ तीन ढोबळ कालखंडांचाच विचार केला आहे.) त्या तिन्ही टप्प्यांमधील हत्यारे एकाच ठिकाणी विविध थरांमध्ये सापडल्याची नोंद करून टॉड यांनी तसा शोधप्रबंधही सादर केला. संपूर्ण भारतात अशा प्रकारे एकाच भागात विविध थरांमध्ये असे अशी सर्व कालखंडातील अश्महत्यारे सापडण्याची ही घटना म्हणूनच अनोखी होती.

टॉड यांचा अखेरचा प्रबंध त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. त्यामध्ये त्यांनी भारत आणि आफ्रिकेमध्ये सापडणाऱ्या सूक्ष्म हत्यारांचा शोध घेतला होता. त्यानंतर स्वत: ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि भारतीय पुरातत्त्वाचे जनक म्हणून गौरवले गेलेले डॉ. एच. डी. सांकलिया यांनी विविध तज्ज्ञांबरोबर चार खेपेस कांदिवली येथील अश्महत्यारे सापडलेल्या ठिकाणांना भेट दिली, मात्र पुरापाषाण युगातील हत्यारे काही त्यांना सापडली नाहीत. १९४९मध्ये फेब्रुवारी महिन्यात प्रा. झेऊनैर, १९५८ साली प्रा. टी. डी. मॅक्कौन यांच्यासोबत सांकलिया यांनी भेट दिली होती. १९५८मध्ये एस. सी. मलिक यांनी बडोदा येथील एस. एस. विद्यापीठाच्या वतीने या परिसराचे सर्वेक्षण केले होते. टॉड यांनी वर्णन केल्याप्रमाणेच इथे मातीचे थर मलिक यांना सापडले, मात्र त्या थरांमध्ये पुरापाषाण युगातील हत्यारे काही सापडली नाहीत. त्यानंतर १९६० सालच्या डिसेंबर महिन्यात डॉ. सांकलिया यांनी त्यांचे दोन विद्यर्थी डॉ. जी. सी. मोहपात्रा आणि व्ही. एन. मिश्रा यांच्यासमवेत मुंबईतील अश्महत्यारांचा शोध घेण्यासाठी हा भाग पालथा घातला. मात्र टॉड यांनी रेखाचित्रे प्रकाशित केलेली पुरापाषाण युगातील अश्महत्यारे सापडली नाहीत. अर्थात असे असले तरी टॉड यांना सापडलेल्या हत्यारांचे अस्तित्व नाकारता येत नाही, असाच निष्कर्ष सांकलिया त्यांच्या शोधप्रबंधाअखेरीस काढतात. यावर अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करताना सांकलिया म्हणतात की, तत्कालीन माणूस काही केवळ याच कांदिवली- बोरिवली परिसरात वस्तीस नसावा. तो शिकारी- भटक्या होता. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारा त्यासाठी पालथा घालायला हवा. कारण या किनाऱ्यावरच त्याचे अस्तित्व सर्व थरांमध्ये सापडू शकते. मुंबईमध्ये मात्र आता अशी जागा सापडणे विकासकामांमुळे कठीण आहे, असा उल्लेख सांकलिया यांनी १९६० साली प्रकाशित केलेल्या शोधप्रबंधामध्ये केला आहे.

मुंबईतील अश्महत्यांरांच्या संदर्भात मध्याश्मयुगीन हत्यारे (नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या संशोधनानुसार इसवी सनपूर्व १० हजार ते इसवी सनपूर्व दोन हजार असा कालखंड) बऱ्यापैकी अश्महत्यारे मुंबईत सापडली आहेत. सूक्ष्म हत्यारेदेखील (मायक्रोलिथ्स) सापडली आहे. मात्र पुरापाषाण युगाची कडी जोडण्यास अद्याप फारशी मदत झालेली नाही. हे असे का, याबाबत विचारता अश्महत्यारांच्या विषयातील तज्ज्ञ तोसाबंता प्रधान सांगतात, पुरापाषाण युगातील हत्यारे मातीच्या सर्वात खालच्या थरातच सापडतात. ज्या वेळेस ती मातीच्या वरच्या थरात सापडतात, त्या वेळेस त्यावर असलेल्या मातीच्या थराची बऱ्यापैकी धूप झाली आहे, असे नेहमीच लक्षात येते. ही हत्यारे प्रामुख्याने नदीखोऱ्यांमध्ये किंवा टेकडय़ांच्या पायथ्याशी सापडतात. कांदिवलीचा परिसर नेमका तसाच आहे. याचप्रमाणे नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या गुंफांमध्येही त्यांचे अस्तित्व आढळले आहे. मध्यप्रदेशातील भीमबेटकामध्ये अशी अश्महत्यारे गुहांमध्ये सापडली आहेत. मुंबई मनोरी येथे सापडलेली दोन हत्यारे अशी पुरापाषाण युगातील असावीत, असा अंदाज आहे. मुंबईतील समुद्राची पातळी पूर्वी कमी होती. आता विकासकामांमुळेही किनाऱ्यांची रचना बदलली आहे. त्यामुळे मुंबईपासून बाजूचा १५० किलोमीटरचा परिसर त्यासाठी पिंजून काढायला हवा. मुंबईत कदाचित नाही, पण आजूबाजूला अशी पुरापाषाणयुगीन हत्यारे अधिक सापडू शकतात.

मुंबईच्या बाबतीत आणखी एक शक्यता लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे इथे होणाऱ्या तुफान पावसाची. या तुफान पावसामध्ये जमिनीची धूप खूप मोठय़ा प्रमाणावर होते. कांदिवलीच्या संदर्भात सांकलिया यांनी केलेल्या नोंदी व्यवस्थित वाचल्या तर असे लक्षात येते की, इथे चांगल्या प्रतीचे जंगल असावे. मात्र आज केवळ बंजर जमीनच पाहायला मिळते. टॉड यांनी कांदिवलीला शोध घेतला, त्या वेळेस झाडे फारशी नव्हतीच. त्यामुळे इथे झाडे गेल्यानंतर आणि पोयसर नदीला पावसानंतर आलेल्या पुरामुळे आणि उघडय़ा पडलेल्या जमिनीमुळे इथे धूप खूप मोठय़ा प्रमाणावर झाली असावी. एस. सी. मलिक यांनी मुंबई संदर्भातील नोंद करताना असे म्हटले आहे की, मध्याश्मयुगीन हत्यारे ही प्रामुख्याने काहीशा उंचावर असलेल्या ठिकाणांवर सापडली आहेत. चेंबूर, तुर्भे इथे टेकडय़ांवर त्याचप्रमाणे गोरेगाव, आरे परिसरामध्येही ती टेकडय़ांवर किंवा गुंफांमध्ये सापडल्याची नोंद आहे. एकूणच आज या सर्व अभ्यासकांच्या नोंदी वाचताना असे लक्षात येते की, मढ, मनोरी येथे किनारपट्टीवर सापडलेली अश्महत्यारेही किनाऱ्याजवळील उंच टेकडय़ांवरच सापडली आहेत. पावसात पाण्याची पातळी वाढल्यास सुरक्षित ठिकाण म्हणून उंचावरील जागांचा वापर माणसाने केलेला असावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसात काहीच करता येत नाही, अशा वेळेस नैसर्गिक गुहांमध्ये अश्महत्यारे तयार करण्याचा उद्योग तत्कालीन माणसाने केलेला असावा. सर्वाधिक अश्महत्यांरांची निर्मिती पावसाच्या चार महिन्यांतील असावी. महत्त्वाचे म्हणजे याच पाश्र्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाच्या साष्टी बेटाच्या गवेषण प्रकल्पात २०१६ साली तुळशी तलाव परिसरात काम करणाऱ्या गटाला तुळशीच्या किनाऱ्यावर सूक्ष्म हत्यारे सापडली.. आणि तब्बल सुमारे ५० वर्षांनी पुन्हा मुंबईत अश्महत्यारे सापडल्याची नोंद झाली!

विनायक परब vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab