News Flash

तुटलेला हात जोडण्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया

करोना काळातील कदाचित ही देशातील एक आगळी शस्त्रक्रिया असल्याचे जे. जे. तील डॉक्टरांनी सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : जीटी रुग्णालयाच्या शस्त्रक्रियागृहात सकाळपासून अजित कुमारच्या तुटलेल्या हातावर शस्त्रक्रिया सुरू होती. अस्थिशल्य चिकित्सकांनी तुटलेल्या हाताचे हाड जोडले.. पाठोपाठ रक्तवाहिन्या जोडण्याचे काम सुरु झाले.. हे एक आव्हान होते. सुघटन शल्यविशारदांनी ( प्लास्टिक सर्जन) ते लीलया पेलले..  तब्बल ११ तास अजितचा हात जोडण्याची शस्त्रक्रिया चालली होती.

करोना काळातील कदाचित ही देशातील एक आगळी शस्त्रक्रिया असल्याचे जे. जे. तील डॉक्टरांनी सांगितले.

भायखळा रेल्वे स्थानकात १६ मार्च रोजी कामावर जाण्यासाठी धावत्या लोकलमध्ये चढण्याच्या प्रयत्नात अजित कुमार फलाटावर पडला व त्याचा हात लोकलखाली आल्याने कोपराखाली संपूर्ण तुटला. त्याचा तुटलेला हात व अजितला घेऊन भायखळा रेल्वेतील कर्मचारी जे. जे. रुग्णालयाच्या अपघात विभागात पोहोचले. तेथे  शस्त्रक्रियागृह दुरुस्तीसाठी बंद असल्यामुळे जीटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अस्थिशल्यचिकित्सकांनी तुटलेल्या हाताचे हाड जोडून दिले. सुघटन शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत घारवाडे , सहयोगी प्राध्यापक डॉ.  योगेश जयस्वाल व डॉ. नितीन मोकल यांनी जोडलेल्या हाताला आकार देण्याचे काम हाती घेतले. अकरा तासांनी शस्त्रक्रिया पूर्ण झाली असली तरी पुढचे काम खूपच अवघड होते. त्याच रात्री उशिरा अजित कुमारला जे. जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. जवळपास २१ दिवस डॉक्टर अहोरात्र त्याची काळजी घेत होते. दरम्यानच्या काळात अजितला करोना झाल्याचे चाचणीत आढळून आले.   त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पाच दिवस  काटेकोर काळजी घेतल्यानंतर करोनामुक्त झाल्याने पुन्हा  ‘जे. जे.’त  हलविण्यात आले.

रुग्णालयातील वॉर्ड ३६ मध्ये दाखल करण्यात आले. तीन एप्रिलपासून त्याच्यावर वॉर्डात रोज ड्रेसिंग केले जात आहे. आता त्याचा हात पुन्हा पूर्ववत झाला असून त्याला लवकरच घरी जाऊ दिले जाणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी काही छोटय़ा शस्त्रक्रियांसाठी त्याला रुग्णालयात यावे लागेल, असे डॉ. घारवाडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 3:34 am

Web Title: rare surgery to connect broken hand in gt hospital zws 70
Next Stories
1 आठवडय़ाभरात १,२०३ पोलीस बाधित
2 टाटा रुग्णालयाच्या माध्यमातून ५०००‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’
3 निवृत्तीनंतर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर आघाडी सरकारचा भर
Just Now!
X