५ वर्षांत ३६ हजारांहून अधिक चालकांवर कारवाई; नियमांच्या उल्लंघनाचा आलेख ४० टक्क्यांनी वाढला

वाहतुकीच्या नियमांना धुडकावण्याची बेदरकार वृत्ती, दंडाची क्षुल्लक रक्कम यामुळे मुंबईत वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहन हाकणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. २०११मध्ये आठ हजार वाहनचालकांना बेदरकार वाहन चालविल्याबद्दल दंड करण्यात आला होता. २०१५मध्ये हे प्रमाण ११ हजार इतके प्रचंड वाढले आहे.

२०११ ते २०१५ या कालावधीत एकूण ३६ हजार २१५ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ६९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात बेदरकार वाहन चालवल्यास केवळ १०० रुपये इतकी क्षुल्लक रक्कम दंड म्हणून आकारली जात असल्याने हे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई व उपनगरात एकूण २५ लाख वाहने रस्त्यावर धावत असतात. यावर देखरेख ठेवण्यासाठी सुमारे ३ हजार वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. वाहनाच्या संख्येत हे प्रमाण फारच अपुरे आहे. त्यामुळे अनेक वेळा वाहतूक पोलिसांना न जुमानता वाहनचालक वाऱ्यासोबत स्पर्धा करत बेदरकारपणे वाहन चालवत असतात. यात दुचाकी चालकांचे प्रमाण सर्वाधिक असून हे प्रमाण वाढत आहे. यावर वाहतूक पोलिसांनी अशा चालकांना समुपदेश देण्यास सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी बेदरकार वाहन चालवण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणी अंमलदारांची ग्रस्त वाढवण्यात येते असे सांगण्यात आले. यात सीसीटीव्हीच्या मदतीने बेदरकार वाहन चालकांवर नजर ठेवली जाते. तसेच तातडीने कारवाई केली जाते.
bike1

केवळ मुख्य आणि मोठय़ा मार्गावरच नव्हे तर छोटय़ा छोटय़ा मार्गावरूनही दुचाकी चालक बेदकारपणे वाहन चालवत असतात. यात अनेकदा रस्त्याने चालणारे प्रवासीही जखमी होतात. याला दंडाची रक्कम कमी असल्याचे मुख्य कारण आहे.