‘लोकसत्ता गप्पा’च्या नव्या पर्वात राशिद खान; संवादक राहुल रानडे

मुंबई : उस्ताद गुलाम मुस्तफा खान हे नाव भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात फार आदराने घेतले जाते. उस्ताद राशिद खान यांचे भाग्य असे की हे ज्येष्ठ कलावंत म्हणजे त्यांचे मामा. जन्मापासूनच स्वरांच्या सान्निध्यात राहायला मिळाल्यामुळे त्यांचे संस्कारही सहजपणे होत गेले. संगीताची गोडी नसली, तरीही ती लागणे अगदीच स्वाभाविक होते. ज्या काळात ते संगीत शिकायला लागले, तो काळ संगीतासाठी बहराचा होता. नव्या समाज माध्यमांचा उदयही झाला नव्हता. त्यानंतरच्या काळात सगळ्याच क्षेत्रात जे बदल झाले, त्याचा संगीतावरही परिणाम होणे स्वाभाविक होते. या बदलांचे साक्षीदार असलेले उस्ताद राशिद खान यांच्याशी गप्पा मारण्याची संधी ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी, दि. १९ रोजी मिळणार आहे.

प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे या कार्यक्रमात उस्तादजींशी संवाद साधणार आहेत. ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात विविध क्षेत्रात नाममुद्रा उमटविणाऱ्या अनेक कलावंत, साहित्यिक यांच्याशी गप्पा मारण्याची संधी रसिकांना मिळाली आहे. आयुष्यभर आपल्या प्रतिभेने एखाद्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अशा व्यक्तींबरोबर होणारा संवाद हा नेहमीच संपन्न अनुभव असतो. यावेळीही भारतीय अभिजात संगीताच्या क्षितिजावर तळपत राहणाऱ्या राशिद खान यांच्याबरोबर संवाद साधता येणार आहे.

प्रायोजक

‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक एम. के. घारे ज्वेलर्स असून पॉवर्ड बाय महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी), तन्वी हर्बल्स आणि इंडियन ऑईल आहे.