07 April 2020

News Flash

चमचमीत पोहे, पनीर चाट आणि गाजराचे पराठे..

शेफ विष्णु मनोहर संपादित ‘रसोई पाककृती विशेषांका’ने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

 

स्वयंपाक ही कला आहे, शास्त्र आहे.. परंतु स्वयंपाक करणे हे आव्हानही आहे, याचा अनुभव किती जणांनी घेतला आहे? नुकतेच हे आव्हान दादरच्या पालक संघाने एका पाककृती स्पर्धेच्या निमित्ताने पेलले. आव्हान यासाठी म्हणायचे कारण ही स्पर्धा पालकांची नव्हे तर वीसपासून पुढील वयोगटाच्या विशेष म्हणजे गतिमंद मुला-मुलींमध्ये होती.

शेफ विष्णु मनोहर संपादित ‘रसोई पाककृती विशेषांका’ने या स्पर्धेचे आयोजन केले होते. गतीमंद मुलांना हातात चिमटा धरता येत नाही किंवा गॅस पेटवितांना हात स्थिर ठेवणे जमत नाही. लाटणे हातात धरून पोळी लाटणे म्हणजे कसरतच. पण या मुलामुलींनी स्वत: जमतील तशा पाककृती करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले.

कोणती पाककृती करायची हे त्यांना पालकांनी सुचविले. त्यांची पाककृती होईपर्यंत पालक त्यांच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेऊन होते. प्रत्यक्ष पाककृती मुलामुलींनीच केली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविलेल्या भावना काळे या मुलीच्या आईने तिला पोहे करण्यास सांगितले होते. मात्र जेव्हा पाककृती सुरू झाली तेव्हा आवडीप्रमाणे तिने त्यात अनेक पदार्थ घालायला सुरुवात केली आणि शेवटी साध्या कांद्यापोह्य़ाचे पोहे पनीर चाट झाले. पदार्थ तयार करीत असतानाच तिने आपल्या आवडीप्रमाणे त्यात तिखट शेव, चपटी पूरी, तळलेले पनीर घातले आणि त्यातून एक वेगळाच प्रकार तयार झाला. त्या २१ वर्षांच्या मुलीची कल्पनाशक्ती पाहून परीक्षकही अवाक झाले. एकूण १४ मुलांनी यात भाग घेतला.या १४ स्पर्धकांमध्ये केवळ एकच मुलगा होता. अभिजीत सदोरे या मुलाने तर बीट-गाजराचे पराठे तयार केले होते. त्याला खाण्याबरोबरच पदार्थ तयार करण्याचीही खूप हौस आहे. तो स्वयंपाकघरात आईला कायम जमेल तशी मदतही करतो. त्यामुळे या पाककला स्पर्धेत पराठय़ाचे पीठही त्यानेच मळले. हे पाहून उपस्थित परिक्षक भारावून गेले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रसोई अंकाचे सल्लागार संपादक तुषार देशमुख आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वागबावकर या उपस्थित होते. गतीमंद मुलांना दैनंदिन काम करणेही अवघड जाते. अशावेळी या मुलांनी विविध पदार्थ तयार करणे कौतुकास्पद आहे, अशी भावना परीक्षकांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या स्पर्धामुळे गतीमंद मुलांमधील आत्मविश्वास वाढीस लागतो. त्यांना काहितरी नवीन केल्याचे समाधान मिळते. त्यामुळे आतापर्यंतची ही अनोखी पाककला स्पर्धा होती असे आयोजकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2017 1:24 am

Web Title: rasoi pakkruti vishesh competition chef vishnu manohar
Next Stories
1 पोलीस दलात मोठे फेरबदल!
2 काळी-पिवळीचीही घरबसल्या ‘बुकिंग’
3 निवृत्तीनंतरही डॉ. वेळुकरांमागील शुक्लकाष्ट सुरूच!
Just Now!
X