राजावाडी रुग्णालयातील घटना

मुंबई : घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या डोळ्याला उंदराने चावा घेऊन जखमी केल्याचे मंगळवारी निदर्शनास आले आहे. रुग्णालय प्रशासनाने ही घटना घडल्याचे मान्य केले असून याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी मंगळवारी दिले आहेत. या घटनेनंतर पालिका रुग्णालयातील स्वच्छतेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कुर्ला कमानी येथील इंदिरा नगरचे रहिवासी श्रीनिवास येल्लपा (वय २४) याला सहा महिन्यांपासून फुफ्फुसाचा आजार आहे. दोन दिवसांपूर्वी त्याची प्रकृती बिघडल्याने रविवारी रात्री घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेला श्रीनिवास हा बेशुद्धावस्थेत होता. त्याची बहीण यशोदा येल्लपा मंगळवारी सकाळी त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात आली असता, श्रीनिवासच्या डोळ्याच्या वर आणि डोळ्यांच्या खाली जखमा आढळून आल्या. उंदराने त्याच्या डोळ्याला चावा घेतल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने रुग्णालयात असलेल्या परिचारिका याना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत तिने राजावाडी रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे देखील तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान महापौरांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. रुग्णालयात घडलेला हा प्रकार गंभीर असून नेत्ररोग विभागाच्या डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली आहे. डोळ्याला इजा झालेली नाही रुग्णाच्या पापण्याखाली जखमा झालेल्या आहे. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पूर्वीही घटना, पालिकेची केवळ आश्वासने 

२०१७ मध्ये शताब्दी रुग्णालयातही तीन रुग्णांच्या डोळ्यांना उंदरांनी चावा घेतल्याचे आढळले होते. या प्रकरणी मानवी हक्क आयोगानेही दखल घेत प्रत्येकी दोन लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश पालिकेला दिले होते. पालिका रुग्णालयात स्वच्छता न राखल्यामुळे उंदरांसह मांजरे, कुत्रे यांचा वावर अगदी अतिदक्षता विभागापर्यत असल्याच्या काही घटनाही या आधी समोर आल्या आहेत. मात्र, प्रत्येक वेळी केवळ स्वच्छतेबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन पालिकेकडून दिले जाते.

अतिदक्षता विभाग तळमजल्यावर असून येथे उंदरांचा वावर आहे. प्रथम दर्शनी उंदराने चावा घेतल्याचे दिसून येत असले तरी डोळ्याला या जखमा कशामुळे झाल्या याची तपासणी केली जात आहे.

      – डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक,  राजावाडी रुग्णालय