दीड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर संस्थांना कंत्राट

शहरात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी विविध परवानग्या, ना हरकती देण्याची प्रक्रिया सोपी करणारा ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ हा कार्यक्रम हाती घेणाऱ्या महापालिकेला मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली कामे लाल फितीच्या कारभारातून बाहेर काढणे मात्र जमलेले नाही. लेप्टोसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या मूषकांच्या संहाराचे काम पावसाळ्याच्या तोंडावर करावे लागते. मात्र नियमांमधील ताठरतेमुळे हे काम मार्गी लावण्याकरिता पालिकेला तब्बल दीड वर्षांचा कालावधी लागला आहे. खासगी मूषकसंहारक कंत्राटदार नेमण्यात पालिकेला यश आले असून पावसाळ्याने काढता पाय घेतल्यानंतर हे काम शहरभर सुरू होईल.

शहराच्या दक्षिण भागात मूषकसंहारक असले तरी उपनगरात मात्र उंदरांची संख्या अमर्याद वाढली आहे. कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात रुग्णांना चावलेले उंदीर हे त्याचे एक उदाहरण. त्याचप्रमाणे पावसाळ्यात उंदरांच्या विष्ठेवाटे पसरणाऱ्या लेप्टोचा धोकाही आहेच. ठिकठिकाणी टाकला जाणारा कचरा, अन्नपदार्थ यामुळे वाढलेल्या बेसुमार उंदरांना लगाम घालण्यासाठी गेल्या वर्षी पावसाळ्याआधी संपूर्ण शहरात मूषकसंहारक कंत्राटदार नेमण्याचे ठरले. त्यासाठी प्रत्येक वॉर्डनुसार संस्था नेमण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. पालिकेकडील मूषकसंहारकांना दर दिवशी ३० उंदीर मारण्याचे उद्दीष्ट दिले जाते. त्यानुसार या संस्थांनाही त्यांच्याकडील परिसरानुसार दरदिवशी १२० ते १५० उंदीर मारण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्याचसोबत प्रत्येक उंदरासाठी प्रत्येकी दहा रुपये शुल्कनिश्चिती झाली. मात्र केवळ दहा रुपयात एक उंदीर मारण्यासाठी कोणत्याही संस्था पुढे आल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा निविदा काढून प्रत्येक उंदरामागे १८ रुपये देण्याची पालिकेने तयारी केली. तोपर्यंत २०१६ चा पावसाळा निघून गेला होता. एवढे करूनही पालिकेच्या निविदांना केवळ सहा वॉर्डमधूनच तीनहून अधिक संस्थांनी प्रतिसाद आला. तीनपेक्षा कमी निविदा आल्यास संस्थांना काम देता येत नसल्याने एप्रिलमध्ये या सहा वॉर्डमधील संस्थांचे कामाचे आदेश देण्यात आले. इतर वॉर्डमध्ये मात्र संस्थांचा अल्प प्रतिसाद वाढवण्यासाठी तसेच ज्या वॉर्डमध्ये एकच निविदा आली होती, त्यांना काम देण्यासाठी विशेष परवानगी काढण्यात यावर्षीचा पावसाळाही गेला. उर्वरित १८ पैकी ११  वॉर्डमध्ये उंदीर मारण्यासाठी पुढे आलेल्या एकमेव संस्थेला तसेच उर्वरित सात वॉर्डमध्ये दोनपैकी एका संस्थेला काम देण्याचे निश्चित झाले आहे.

‘दिवाळीनंतर या संस्थांच्या कर्मचाऱ्यांना उंदीर मारण्याचे एक आठवडय़ाचे प्रशिक्षण देण्यात येईल व त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात कामाचे आदेश देण्यात येतील. त्यामुळे संपूर्ण शहरातून दररोज तीन हजार उंदीर पकडले जातील,’ असे पालिकेच्या किटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले.

महत्त्वाचे म्हणजे एवढय़ा गुंतागुंतीनंतर व प्रशासकीय फेऱ्यानंतर दीड वर्षांनी संपूर्ण शहरात मूषकसंहारक नेमले जाणार असले तरी एप्रिलमध्ये पहिल्या कामाचे ११ महिन्याचे कंत्राट दिले गेल्याने या संस्थांचाही कालावधी तेव्हापासून गृहित धरण्यात येईल. त्यामुळे या संस्थांना प्रत्यक्षात केवळ पाच ते सहा महिनेच कामासाठी मिळतील.

त्यानंतर शहरात मूषकसंहाराचे कंत्राट देण्यासाठी या सर्व प्रशासकीय परवानग्यांना आणखी एक फेरा पूर्ण करावा लागेल.

दररोज तीन हजार उंदीर मारण्याचे उद्दिष्ट

महानगरपालिका उंदीर मारण्यासाठी केवळ औषध आणि पिंजऱ्यांचाच वापर करते. प्रत्येक मूषक संस्थेला त्यांच्या विभागानुसार १२० ते १५० उंदीर मारण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार शहरात दररोज सरासरी तीन हजार उंदीर मारले जातील. त्याचप्रमाणे सध्या पालिकेच्या ३० मूषकसंहारांकडून सातशे ते आठशे उंदीर मारले जातात.

कांदिवली शताब्दीमध्ये ४४ मूषकांचा संहार

कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात रुग्णांना उंदीर चावल्यानंतर पालिकेकडून उंदरांना मारण्याची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली असून गेल्या चार दिवसात ४४ उंदरांना यमसदनी धाडण्यात आले आहे.

कचऱ्याचे प्रमाण अत्यल्प असलेल्या ठिकाणी उंदीर आढळत नाहीत. नेपियन्सी रोड, चर्नी रोडमधील काही परिसर, अंधेरीमधील चार बंगला, सात बंगला येथे उंदरांचा सुळसुळाट नाही. मात्र फेरीवाल्यांकडून टाकला जाणारा कचरा, कचऱ्याने भरलेल्या हाउसगल्लय़ा यामुळे उंदरांना भरपूर खाद्य मिळते. उंदरांना सहजासहजी खाद्य मिळत असल्याने त्यांची संख्या वेगाने वाढते हे लक्षात घेतले पाहिजे.  – राजन नारिंग्रेकर, किटकनाशक विभागाचे प्रमुख