दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानात ३३ लाख कुटुंबांना शिधापत्रिका आणि ४० लाख गॅस जोडण्या (कनेक्शन) मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले.

या अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर,  रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत,  आमदार मंगल प्रभात लोढा, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या अभियानामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचता येणार आहे. अतिरिक्त अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ‘धूरमुक्त महाराष्ट्र’ ही योजना जाहीर केली होती. केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशातील आठ कोटी महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली होती. आता दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानामुळे महाराष्ट्रातील ४० लाख कुटुंबांना धुरापासून मुक्ती मिळून गॅस कनेक्शन मिळणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने डिजिटायझेशनच्या माध्यमातून गैरव्यवहाराला आळा घालण्यात यश मिळविले आहे. चुकीचे लाभधारक शोधून काढून त्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात आल्यामुळे वंचित लाभार्थ्यांपर्यंत विभागाला पोहोचता येणे शक्य झाले असल्याचे फडणवीस  यांनी सांगितले.