News Flash

रत्नाकर गुट्टेंच्या संपत्तीवर बँकांचा ताबा, १७३७ कोटींची थकबाकी

 सुनील हायटेक या कंपनीला दिलेले बहुतांश कर्ज आता थकीत झाले असल्यामुळे बँकांचा तोटा वाढण्याची शक्यता आहे.

गंगाखेड शुगर कर्ज प्रकरणात अटकेत असलेले रत्नाकर गुट्टे यांच्या सुनील हायटेक या कंपनीकडे १७३७ कोटी ६३ लाख ३० हजार २०२ रुपयांचे कर्ज थकीत असल्याची नोटीस युको बँकेने प्रसिद्धीस दिली आहे. विशेष म्हणजे हे कर्ज वसूल करण्यासाठी गुट्टे आणि त्यांच्या कुटुंबीयांची परळी आणि गंगाखेडमधील संपत्ती ताब्यात घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

गंगाखेड शुगरबरोबर रत्नाकर गुट्टे यांच्या नावे असणाऱ्या सुनील हायटेक या कंपनीला युनायटेड बँक ऑफ इंडिया, लक्ष्मीविकास बँक आणि ओरिएंटल बँक, आयसीआयसीआय, आयडीबीआय, सिंडिकेट, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, करुर वैश्य बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांनी एकत्रितपणे कर्ज दिले होते. २०१८ पर्यंत कर्जाची ही रक्कम १४२० कोटी ७७ लाख ३५ हजार ७७ एवढी होती. त्याचे ३१ डिसेंबपर्यंतचे व्याज ३३६ कोटी ८५ लाख ९५ हजार १२५ एवढे होते. ही सगळी रक्कम वसूल करण्यासाठी युको बँकेने घर, भूखंड, शेतजमीन ताब्यात घेण्याची नोटीस जाहीर केली आहे.  रत्नाकर गुट्टे, तसेच सुनील हायटेकचे संचालक सुधामती गुट्टे, विजय रत्नाकर गुट्टे व सुनील रत्नाकर गुट्टे यांच्या नावे परळी येथील घर व गंगाखेड तालुक्यातील बाणपिंपळा येथील जमीन ताब्यात घेत असल्याचे बँकांनी कळविले आहे.

सुनील हायटेक या कंपनीला दिलेले बहुतांश कर्ज आता थकीत झाले असल्यामुळे बँकांचा तोटा वाढण्याची शक्यता आहे. रत्नाकर गुट्टे यांनी प्रमुख राजकीय पक्षात काम केले आहे. अटक होण्यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षात त्यांनी प्रवेश घेतला होता.

‘रक्कम वसूल कशी होणार?’

परळी आणि गंगाखेड या दोन्ही ठिकाणची गुट्टेंची संपत्ती विकल्यानंतर बँकेची वसुली कशी होईल, असा सवाल या प्रकरणी फिर्याद दाखल करणाऱ्या गिरीश सोळुंके आणि त्यांचे वकील अ‍ॅड. मयूर लोढा यांनी केला आहे. मराठवाडय़ातील जमिनीला बाजारमूल्याप्रमाणे एवढी किंमत मिळणे अशक्य असल्याचा दावा अ‍ॅड. लोढा यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 1:49 am

Web Title: ratnakar gutte financial scams mpg 94
Next Stories
1 खोटी जाहिरातबाजी करून पदवींची विक्री
2 जायकवाडी ७१ टक्क्यांवर; मेघ बीजरोपणाची चाचणी पूर्ण
3 मुस्लिमांची मते मौलवींच्याच हाती
Just Now!
X